भ्रष्टाचारमुक्त राज्य निर्माणाची गरज : सचिन पायलट

पुणे – भाजप धर्माच्या आडून सत्तेसाठी राजकारण करत आहे. एक है तो सेफ है, बटेंगे तो कंटेंगे यांसारख्या घोषणा देणे भाजपला शोभत नाही. उलट आम्ही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पढेंगे तो आगे बढेंगे, अशी घोषणा देत आहोत, असे राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र् राज्य भ्रष्टाचारमुक्त करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव, अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहमंद, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, ॲड अभय छाजेड, सुनील शिंदे उपस्थित होते.
देशाचे चित्र बदलण्याचे काम महाराष्ट्र राज्य करते. भाजपने विकासाच्या मुद्द्यासाठी काहीच केलेले नाही. शेतकरी आत्महत्या, शेतीमालाला हमीभाव न मिळणे, बेरोजगारी, महागाई यावर भाजप काहीच बोलत नाही. महायुती शासनाकडून एकीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पात्र महिलांना १ हजार ५०० रुपये दिले जात आहेत.
दुसरीकडे सर्व महागाई वाढवून नागरिकांच्या खिशातील रकमेवर डाका टाकण्याचे काम केले जात आहे, अशी टीकाही सचिन पायलट यांनी केली आहे. लोकशाही, संविधान, महाराष्ट्र वाचविण्याची खरी आवश्यकता निर्माण झाली आहे. जनतेला पारदर्शक कारभार करणारे सरकार हवे आहे, असेही त्यांनी नमूद केले.





