पुणे – बदलती जीवनशैली आणि रोजच्या कामाच्या व्यापामुळे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) याचे प्रमाण वाढत आहे. याबाबत अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी आरोग्य तपासणी सारखे उपक्रम मोठ्या संख्येने राबविण्याची गरज आहे, असे मत भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील महिलांसाठी सिंहगड रोड येथे हे तपासणी शिबिर घेण्यात आले. याचे उद्घाटन वाघ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे, सामाजिक कार्यकर्त्या सरोज पांडे, शहर भाजपचे सरचिटणीस दीपक नागपुरे तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.