उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार महाराष्ट्रातून? नावा बद्दल झाली महत्वाची चर्चा…
नवी दिल्ली – उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील रालोआ (एनडीए)चा उमेदवार तीनपैकी एका राज्यामधून निवडला जाणार असल्याची चर्चा आहे. यात महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. शिवाय, रालोआचा उमेदवार जाट किंवा दलित समुदायातून असण्याची शक्यता आहे.
भाजपने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रालोआचा उमेदवार ठरविण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या खांद्यावर टाकली आहे. या दोन्ही नेत्यांनी उमेदवाराच्या मुद्यावर आज चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. बिहार विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे.
जगदीप धनखड हे जाट समुदायाचे प्रतिनिधीत्व करतात. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे जाट समुदाय नाराज झाला आहे. त्यांची नाराजी दूर करणे भाजपसाठी महत्वाचे आहे. अशात, रालोआचा उमेदवार जाट असणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु, महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालमधून उमेदवाराची निवड केली जाईल, असे म्हटले जात आहे.
महत्वाचे म्हणजे, उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा वाद सुध्दा भाजपच्या नवीन अध्यक्षाच्या नावाप्रमाणे सुरू आहे. भाजप हायकमांडला त्यांच्या पसंतीचा उमेदवार हवा आहे, तर देशाचे नवीन उपराष्ट्रपती संघाचे असावे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटत आहे. यामुळे नागपूर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भाजप हायकमांड पक्षातील नेत्याला संधी देण्याच्या बाजूने आहेत.





