खालापूर, – दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला एनडी स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात गेला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी (दि.२८) स्टुडिओला भेट देत येथील कामकाजाची पाहणी केली. नितीन देसाई यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून स्टुडिओ मध्ये आत्महत्या केली होती. दरम्यान आता हा स्टुडिओ परिचालनासाठी राज्य सरकारने ताब्यात घेतला आहे. गोरेगाव फिल्मसिटीकडे यांच्याकडे हा स्टुडिओ राहणार असून त्यावर महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा ताबा राहणार आहे. देसाई यांच्या मृत्यूनंतर प्रथमच फुलवंती चित्रपटाचे चित्रिकरण येथे करण्यात आले. त्यामुळे नितीन देसाई यांच्या मृत्यूनंतर शांत झालेल्या स्टुडिओत पुन्हा लाईट्स, कॅमेरा, साऊंडचा आवाज घुमणार आहे. देसाई यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे बोलले जाते, ज्यात हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. दरम्यान देसाई यांची ही इच्छा सत्यात उतरताना दिसत आहे.