भोर : भोर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील उत्रौली-कारी जिल्हा परिषद गटात मोठा राजकीय उलटफेर व जनमताचा कौल उमटला. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांचा पराभव करीत भाजपच्या उमेदवार स्वरूपा थोपटे यांनी ५ हजार ६४४ मताधिक्याने विजय मिळवला. शिवतरे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्याला बसलेल्या या धक्क्यामुळे तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे. रणजित शिवतरे यांच्या पराभवाने त्यांची झेडपी अध्यक्षपदाची संधी हुकली आहे. यावेळी संग्राम थोपटे यांच्या संघटन कौशल्याचा विजय अधोरेखित झाला आहे. उत्रौली-कारी गटात हाय होल्टेज लढत झाली. यावेळी निवडणुकीच्या आखाड्यात सतीश चव्हाण, स्वरूपा थोपटे, सचिन नवघणे, रणजीत शिवतरे व संतोष घोरपडे असे पाच उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत भाजपच्या स्वरूपा थोपटे आणि राष्ट्रवादीचे रणजित शिवतरे यांच्यातच झाली. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे आणि रणजित शिवतरे अशा दोन दिग्गजांमध्ये लढत असल्याने, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. भाजपाच्या थोपटे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शिवतरे यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला. ही लढत थोपटे आणि शिवतरे यांच्या प्रतिष्ठतेची असल्याने दोन्ही उमेदवारांकडून जोरदार यंत्रणा राबविली होती. प्रचाराच्या शेवटच्या दिवसांपर्यंत माजी आमदार संग्राम थोपटे, स्वरूपा थोपटे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ देत शिवतरे यांचा बालेकिल्ला उद्धवस्त केला. हा पराभव शिवतरे यांच्यासाठी जिव्हारी लागणारा ठरला आहे. भोर विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांचा पराभव झाला होता. त्यावेळी शिवतरे यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली होती. ऐन फार्मात असताना रणजित शिवतरे यांना हा धक्का पाच वर्षांसाठी विजनवासात घेऊन जाणारा ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवतरे यांचे कट्टर समर्थक अप्रत्यक्षपणे त्यांची साथ सोडल्याने हा फटका बसल्याची चर्चा आहे. विकासाच्या बालेकिल्ल्यात ‘सुरूंग’ रणजित शिवतरे यांनी मागील काही वर्षांत उत्रौली गटात मोठी विकासकामे केली होती, त्यामुळे हा त्यांचा सुरक्षित बालेकिल्ला मानला जात होता. शिवतरे हे मागील पंचवार्षिकला पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. मात्र, थोपटे यांनी केलेल्या मोर्चेबांधणीमुळे शिवतरेंना पराभवाचा सामना करावा लागला. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विरोधकांसाठी हा मोठा राजकीय इशारा मानला जात आहे. संग्राम थोपटे यांनी प्रतिष्ठा राखली उत्रौली- कारी गटाची ही निवडणूक संग्राम थोपटे व रणजीत शिवतरे यांच्या प्रतिष्ठेची होती. यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत थोपटे यांचा पराभव राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर यांनी केला होता. भोर नगरपरिषदेच्या निवडणुकीत थोपटे यांनी पूर्ण ताकद लावून बहुसंख्येने नगरसेवक निवडून आणले होते. परंतु नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या पक्षाला हार मानावी लागली होती. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे निवडून आले होते. विधानसभा व नगरपरिषद निवडणुकीत थोपटे यांना अपयश आल्याने झेडपीची निवडणूक त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची होती. उत्रौली गटामध्ये त्यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठतेची झाली होती. मात्र, स्वरुपा थोपटे यांच्या विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उभारी मिळाली आहे. दोन दशकांनंतर विजनवास रणजीत शिवतरे यांनी २००६ मध्ये रणजित शिवतरे यांच्याकडे राष्ट्रवादी भोर तालुका युवक अध्यक्षपद होते. त्यावेळी त्यांना राजकारणात प्रवेश केला आहे. त्यानंतर २००७ मध्ये उत्रौली- कारी झेडपी गटातून शिवतरे हे विजयी झाले. त्यांना तीनवेळा यश मिळाले होते. यापूर्वी ते पुणे जिल्हा परिषदेत आरोग्य व बांधकाम सभापती होते. गेल्या निवडणुकीत ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. यावेळी शिवतरे हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दावेदार होते. परंतु त्यांना अपयश आल्याने त्यांचे अध्यक्षपद हुकले आहे.