आयुक्तांच्या आडून राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा; भाजप- आयुक्त वादात राष्ट्रवादीची उडी

पुणे – महापालिका निवडणूकांच्या तोंडावर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतील विकासकामांना मान्यता देण्यास नकार दिल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि आयुक्त कुमार यांच्या वाद सुरू आहेत. या वादाच्या आडून आता राष्ट्रवादीने भाजपवर निशाना साधला असून महापालिका आयुक्त शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले काम करत असून राष्ट्रवादीचा त्यांना पाठींबा असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
विशेष म्हणजे अवघ्या आठवडयाभरापूर्वीच स्थायी समितीत प्रशासनाकडून आयत्यावेळी अनेक प्रस्ताव आणून हेच महापालिका आयुक्त कुमार सत्ताधारी भाजपचे काम करत असल्याची टिका करत राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष जगताप यांच्यासह पक्षाच्या नगरसेवकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आयुक्तांची तक्रार केली होती.
महापालिकेच्या मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिसून आला. अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीच्या विषयावरून सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांसह प्रशासनाचा निषेध करत स्थायी समितीची सभा तहकूब केली होती. तसेच स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आयुक्त शहराच्या विकासाच्या निर्णयांच्या आड येत असल्याची टिका करत आयुक्तांच्या भूमिकेबाबत टिका केली होती. त्यानंतर आता महापालिकेत, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयुक्तांची बाजू घेत भाजपवर निशाना साधला आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गेल्या साडेचार वर्षांपासून महापालिकेतील सत्ताधारी भाजपला काहीच कर्तृत्व सिद्ध करता आले नाही. उलट भोंगळ कारभाराचेच दर्शन पुणेकरांना घडविले आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यांत होणारी महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शहराचे हित जोपासले गेले नाही तरी चालेल पण स्वत:चे आर्थिक हित जोपासले गेले पाहिजे, या एकमेव उद्देशातून महानगरपालिकेचे आयुक्त ुमार आणि प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कोरोनामुळे घटलेले उत्पन्न आणि संभाव्य तिसरी लाट याचा विचार करून आयुक्त कुमार हे आर्थिक निर्णयाबाबत जपून पावले टाकत असताना , भाजपकडून आयुक्तांची भूमिका, त्यामागील कारणे व भविष्याचा विचार याबाबत काहीही देणेघेणे नसल्याचेच सत्ताधाऱ्यांच्या वर्तनातून दिसून येत आहे. त्यातूनच आयुक्त व प्रशासनावर दबाव आणून आपल्याला हवा तसा निर्णय घेण्याची जणू स्पर्धाच सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलाची टिका जगताप यांनी केली आहे.





