“400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर…. यातून मोदींचा डाव लक्षात येतो”, शरद पवार यांचा हातकणंगलेत घणाघात

Ncp sharad pawar on pm modi : मोदींचे खासादर देशाची घटना बदलण्याची भाषा करत आहेत. त्यांचे उत्तर प्रदेशातील एक खासदार 400 पेक्षा जास्त जागा द्या, म्हणजे संविधान बदलता येईल असे म्हणाले. याऊलट मोदी घटना बदलणार नसल्याचे सांगतात. मग त्यांचे खासदार त्यांच्याहून वेगळे कसे काय बोलतात? म्हणजे आता पुन्हा सत्ता आल्यानंतर ते हे देखील करू शकतात. यातून मोदींचा खरा डाव लक्षात येतो, असे शरद पवार म्हणाले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (hatkanangle lok sabha constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (satyajit patil) यांच्यासाठी शिराळ्यात सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.
आपण हुकूमशाहीच्या दिशेने जात आहोत का? –
शरद पवार म्हणाले, 2014 मध्ये पेट्रोलचे दर कमी करण्याची ग्वाही मोदींनी दिली होती. पण आता तेंव्हाचा 70 रुपयांचा दर 100 रुपयांच्या वर पोहोचला आहे. मोदींनी सिलिंडरचा दरही कमी करण्याची शाश्वती दिली होती. पण हे दरही कमी झाले नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा चेहरा बदलला. पण आज ते चांगले काम करूनही तुरुंगात आहेत. त्यांना अटक करण्याची काय गरज होती? आपण हुकूमशाहीच्या दिशेने जात आहोत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. परिस्थिती बदलायची असेल तर सर्वांनी महाविकास आघाडीचे अधिकाधिक खासदार संसदेत पाठवण्याची गरज आहे, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
सत्यजित पाटील यांचा विजय निश्चित – जयंत पाटील
यावेळी सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उपस्थितांना संबोधित केले. जयंत पाटील म्हणाले, हातकणंगलेतील मविआचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा विजय निश्चित आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होईल. देशातील परिस्थिती पाहता शरद पवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघा महाराष्ट्र शरद पवार व उद्धव ठाकरेंच्या मागे आपली ताकद लावत आहे, असे ते म्हणाले.
शरद पवारांनी ऊसाच्या एफआरपीत वाढ केली –
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले, पंतप्रधान मोदी ऊसाला चांगला भाव दिल्याचा दावा करत आहेत. पण प्रत्यक्षात मोदींनी नव्हे तर शरद पवारांनी ऊसाच्या एफआरपीत वाढ केली. ते कृषिमंत्री झाले तेव्हा त्यांनी ऊस उत्पादकांच्या मदतीने एक फॉर्म्युला तयार केला. त्यामुळे दरवर्षी एफआरपीत वाढ होत आहे. याऊलट आज भाजप सरकारमुळे शेती उत्पादन अडचणीत सापडले आहे. त्यांच्या सरकारने शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यावरही कर लावला आहे.
दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे. येथे पंचरंगी लढत होणार आहे. सर्व पक्षाकडून तगडे उमेदवार मैदानात आहेत. शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी, वंचितचे माजी जिल्हा परिषद सदस्य डी. सी. पाटील, शेतकरी नेते रघुनाथ पाटील हे निवडणुकीच्या मैदानात आहेत.





