Top 15 News : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग ते कतरिना-विकीने दाखवली लेकाची झलक…; वाचा आजच्या टॉप १ ५ बातम्या
Top 15 News : Top 15 News : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग ते कतरिना-विकीने दाखवली लेकाची झलक...; वाचा आजच्या टॉप १ ५ बातम्या

Top 15 News : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर तीच खरी दिवाळी
महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना सुरुवात झालीय. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी याबाबत सूचक विधान केलेय. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा एकत्र आले, तर तीच खऱ्या अर्थाने दिवाळी असेल, असे रघुवंशी म्हणालेत. शिवसेना पुन्हा एकत्र येणार की नाही, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेय. मात्र, शिवसेना दुभंगण्याचा प्रसंग यायला नको होता, असे मला पहिल्या दिवसापासून वाटत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चांनंतर आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबतच्या त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटलेय. (Top 15 News)
‘मी कोणत्याही महिलेला खरातकडे नेलं नाही’ : रुपाली चाकणकर
अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सात महिन्यांनंतर मौन सोडलं आहे. ‘आरपार’ युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खरातची पाद्यपूजा का केली, याबाबत स्पष्टीकरण दिलं. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात उपस्थित लोकांच्या आग्रहामुळे आपण पाद्यपूजा केल्याचा दावा त्यांनी केलाय. हा व्हिडीओ २०२१-२२ मधील असून, त्यावेळी मंचावर अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनीही पूजा केल्याचं त्या म्हणाल्या. खरातसोबत कोणताही आर्थिक किंवा जमीन व्यवहार केला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच कोणत्याही महिलेला खरातकडे नेलं नसल्याचा आणि आपला कोणताही आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओ त्याच्याकडे नसल्याचा दावाही चाकणकर यांनी केलाय. आपल्यालाच लक्ष्य केलं जात असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Top 15 News)
पार्थ पवार सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आलाय. शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शनिवारी पार्थ पवार यांनी सिल्व्हर ओक येथे त्यांची भेट घेतली. या भेटीला शशिकांत शिंदे, अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. सुमारे दीड तास चर्चा झाल्यानंतर पार्थ पवार रवाना झाले. विशेष म्हणजे, रविवारी पुन्हा एकदा पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. दरम्यान, राजेंद्र पवार यांनी विलीनीकरणाबाबत १० नोव्हेंबरला स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त केलीय.
ऐन दिवाळीत नागपूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के
दिवाळीच्या उत्साहात नागपूरकरांना आज भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी नागपूर जिल्ह्यात २.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. अचानक धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत नोंदीनुसार, या भूकंपाची तीव्रता २.६ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे ५ किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाची तीव्रता कमी असली, तरी दिवाळीच्या दिवशी अचानक धक्का जाणवल्याने नागपूरकरांमध्ये काही काळ चिंता निर्माण झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाली नसल्याची माहिती मिळतेय. (Top 15 News)
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी
एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मंत्री उदय सामंत यांनी नांदेड जिल्ह्यातील सायाळ या दुष्काळग्रस्त गावात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत फराळ करत संवाद साधला. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून मायक्रो फायनान्स कंपन्यांनी सक्तीने किंवा जबरदस्तीने कर्जवसुली केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उदय सामंत यांनी दिला. अशा कंपन्यांच्या मनमानी कारभारात जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा, असे निर्देशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शासन निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘सेना स्टाईल’ने कारवाई केली जाईल, असा इशाराही सामंत यांनी दिला. (Top 15 News)
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीची ताकद
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने जोरदार तयारी सुरू केलीय. शेतकऱ्यांसाठी अधिक चांगलं काम करण्याच्या उद्देशाने आपण ही निवडणूक लढवत असल्याचे भाजप नेते बसवराज पाटील मुरूमकर यांनी सांगितले. मतदारांनी आम्हाला निवडून देऊन काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे तसेच विनायक पाटील उपस्थित होते. याशिवाय महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. त्यामुळे लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या एकत्रित ताकदीचे प्रदर्शन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. (Top 15 News)
आंब्याच्या पहिल्या मानाच्या पेटीला ४१ हजारांची बोली
लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात आंब्याच्या हंगामातील पहिल्या मानाच्या पेटीचा लिलाव उत्साहात पार पडला. रत्नागिरी आणि देवगड येथून आलेल्या आंब्याच्या पहिल्या मानाच्या पेटीला तब्बल ४१ हजार रुपयांची बोली लागली. यावेळी एकूण सात पेट्यांचा लिलाव करण्यात आला. त्यामध्ये ४१ हजार, २२ हजार, १० हजार आणि ७ हजार रुपयांपर्यंत बोली लागल्याची माहिती आहे. या लिलावासाठी व्यापारी, खरेदीदार आणि आंबाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर झालेल्या या लिलावामुळे पुणे मार्केट यार्डात आंब्याच्या नव्या हंगामाचा शुभारंभ झाला असून, या अनोख्या परंपरेतून आंबा हंगामाचे स्वागत करण्यात आले. (Top 15 News)
दुष्काळाच्या झळा दिवाळीच्या आतषबाजीलाही!
यंदाच्या दुष्काळाचा फटका आता दिवाळीच्या फटाके बाजारालाही बसताना दिसत आहे. धुळे शहरातील फटाके बाजारात दरवर्षी दिवाळीच्या काळात होणारी ग्राहकांची गर्दी यंदा मात्र गायब झालीय. दुकानांमध्ये लाखो रुपयांचा फटाक्यांचा साठा उपलब्ध असतानाही ग्राहकांकडून खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या हंगामात मोठी कमाई होईल, या अपेक्षेने अनेक विक्रेत्यांनी मोठी गुंतवणूक केली होती. मात्र, विक्री मंदावल्याने त्यांना आर्थिक नुकसान होण्याची भीती सतावतेय. एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत, तर दुसरीकडे त्याचा परिणाम व्यापारी आणि व्यावसायिकांवरही होतोय. त्यामुळे यंदा धुळ्यात दिवाळीच्या रोषणाईसोबत फटाक्यांच्या आतषबाजीलाही दुष्काळाचे सावट असल्याचे पाहायला मिळतेय. (Top 15 News)
मंत्र्यांनी घरी नव्हे, थेट तांड्यावर साजरी केली दिवाळी!
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाठ यांनी यंदाची दिवाळी घरी न साजरी करता सहकुटुंब थेट तांड्यावर जाऊन नागरिकांसोबत साजरी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत दिवाळीचा आनंद वाटला. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वखर्चातून पाठवलेल्या आनंदाच्या शिध्याचे तांड्यावर वाटप करण्यात आले. मंत्री संजय शिरसाठ यांनी स्वतःच्या हाताने नागरिकांना या शिध्याचे वितरण केले. हा आनंदाचा शिधा शासनाकडून नव्हे, तर एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या खर्चातून दिल्याची माहिती संजय शिरसाठ यांनी यावेळी दिली. मंत्र्यांनी नागरिकांसोबत दिवाळी साजरी केल्याने तांड्यावरील वातावरणात उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले. (Top 15 News)
राजधानी दिल्लीत भीषण दुर्घटना
राजधानी दिल्लीतील चावडी बाजार परिसरातील गली शीश महल येथे तीन मजली निर्माणाधीन इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडलीय. गुरुवारी सकाळी सुमारे पावणेदहाच्या दरम्यान ही इमारत कोसळली. त्यावेळी काम सुरू असल्याने अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेनंतर पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि महापालिकेच्या पथकांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रविवारी लुच्चुमन मुखिया या ६६ वर्षीय मजुराचा मृतदेह सापडला. अद्याप काही मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तीन ठेकेदारांना फरीदाबाद येथून अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. (Top 15 News)
जिओचा १० हजारांचा धमाकेदार रिचार्ज
रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी १० हजार रुपयांचा नवा प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनची वैधता तब्बल ३६ महिने म्हणजेच तीन वर्षे आहे. यामध्ये दररोज २.५ जीबी हायस्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. पात्र ग्राहकांना अनलिमिटेड ५जी डेटाचाही लाभ मिळेल. याशिवाय JioHotstar Mobile + Hollywood सबस्क्रिप्शन, JioAICloud वर ५० जीबी स्टोरेज आणि १२ महिन्यांसाठी Canva Pro Lite सबस्क्रिप्शन दिले जाणार आहे. मात्र, Canva Pro Lite ची सुविधा केवळ १२ महिन्यांसाठी आहे, संपूर्ण तीन वर्षांसाठी नाही. हा प्लॅन ७ नोव्हेंबरपासून उपलब्ध झालाय. (Top 15 News)
BMW ची नवी अॅडव्हेंचर बाईक भारतात लॉन्च
BMW Motorrad ने भारतीय बाजारपेठेत नवीन BMW F 450 GS Sport अॅडव्हेंचर बाईक लॉन्च केलीय. या बाईकची एक्स-शोरूम किंमत ५ लाख ९० हजार रुपये ठेवण्यात आलीय. ही बाईक F 450 GS च्या Exclusive आणि टॉप-स्पेक GS Trophy व्हेरिएंटच्या मध्ये असणार आहे. विशेष म्हणजे, ऑफ-रोडिंगसाठी यामध्ये स्पोर्ट सस्पेंशन, गिअर शिफ्ट असिस्टंट प्रो आणि Riding Modes Pro यांसारखी फीचर्स देण्यात आलीत. Enduro Pro मोडमुळे खडतर रस्त्यांवर राइडिंग करताना मदत मिळणार आहे. ही बाईक आकर्षक Racing Red रंगात उपलब्ध आहे. याशिवाय LED हेडलॅम्प, Rallye विंडस्क्रीन, ऑफ-रोड फुटपेग आणि प्लास्टिक इंजिन गार्डही देण्यात आलेत. (Top 15 News)
१ लाखांची नोटांची थप्पी अन् चांदीसारखी ताटं
दिवाळीच्या निमित्ताने गुजरातमधील सुरतमधील एका कापड व्यापाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांना अनोखी भेट दिलीय. वराछा परिसरातील व्यापारी रामस्वरूप मुंडे यांनी आपल्या २० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा बोनस दिलाय. विशेष म्हणजे, रोख रकमेच्या बंडलांसोबत चांदीसारखी चमकणारी पूजेची ताटंही कर्मचाऱ्यांना भेट देण्यात आली. व्यापारी आणि त्यांच्या पत्नीने स्वतः कर्मचाऱ्यांना ही भेट दिली. लाखोंचा बोनस पाहून अनेक कर्मचारी आश्चर्यचकित झाले, तर काही महिला कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. कर्मचारी हे केवळ कामगार नसून कुटुंबाचाच भाग आहेत, असं व्यापाऱ्याने सांगितलं. या अनोख्या दिवाळी भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्यापाऱ्याचं कौतुक केलं जातंय. (Top 15 News)
कतरिना-विकीने दिवाळीत दाखवली लेकाची पहिली झलक
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी दिवाळीच्या खास मुहूर्तावर चाहत्यांना आनंदाची भेट दिलीय. या कपलने पहिल्यांदाच आपल्या मुलगा विहानचा चेहरा दाखवत खास कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. या फोटोमध्ये कतरिना आणि विकी आपल्या चिमुकल्याला दोन्ही बाजूंनी प्रेमाने धरताना दिसत आहेत. विहानही दोन्ही हात उंचावून खळखळून हसताना दिसत आहे. कतरिनाने पिवळ्या रंगाचा सूट, तर विकीने क्रीम रंगाचा कुर्ता परिधान केलाय. छोट्या विहाननेही क्रीम कुर्ता आणि पिवळं जॅकेट घातलं आहे. ‘आमची आतापर्यंतची सर्वात उज्वल दिवाळी’, असं खास कॅप्शन देत त्यांनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्यात. हा फोटो सध्या चर्चेत आहे. (Top 15 News)
रायझिंग स्टार्स आशिया कपच्या भारत ‘अ’ संघात बदल
आगामी बहुचर्चित रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय ‘अ’ संघात बीसीसीआयने महत्त्वपूर्ण बदल केलेत. मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज रजत पाटीदार दुखापतीमुळे ५० षटकांच्या फॉरमॅटसाठी वेळेत तंदुरुस्त होऊ न शकल्याने त्याला संघातून वगळण्यात आलेय. पाटीदारच्या जागी आक्रमक फलंदाज आयुष बदोनीला संघात संधी देण्यात आलीय. तसेच फिनिशर रिंकू सिंगकडे उपकर्णधारपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीय. भारतीय ‘अ’ संघ आपल्या मोहिमेची सुरुवात २० नोव्हेंबर रोजी नेपाळ ‘अ’ विरुद्ध वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर करणार आहे. (Top 15 News)





