‘अशा घटना होणार नाहीत यासाठी…’, पुणे बलात्कार प्रकरणावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Chhagan Bhujbal | पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रत्येक माणसाने अशी घटना घडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो. आजकाल लोकं फोटो काढतात आणि निघून जातात. लोकांना रस्त्यावर कोयत्यांनी मारली जाते. फक्त व्हिडिओ काढले जातात, वाचवण्याच्या प्रयत्न कोणी करत नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.
पुण्यातील घटनेवर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ‘महाराष्ट्राला फार मोठी संस्कृती आहे. अशा घटना होणार नाहीत, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. पोलिसांनी शासन करायला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक माणसाने प्रयत्न केले पाहिजे. समाजाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.’
तसेच, महाराष्ट्रात शक्ती कायद्याची अंमलबजावणी कधी सुरू होणार? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, ‘सगळे मागणी करत आहेत, पण काहीतरी अडचणी असतील. नवीन कायद्यामध्ये खरोखर किती अंतर्भाव आहे ते पण पाहावे लागेल. कायदा तर कडक असला पाहिजे.’
दरम्यान, पुण्याच्या घटनेतील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी अटक करत शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. या प्रकरणात न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.





