कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व

संदीप मोरे
रहिमतपूर – कोरेगाव तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. मात्र, बाळासाहेबांची शिवसेना व भाजपने सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेतला असल्याचा दावा केला आहे.
कोरेगाव मतदारसंघातील गावांमध्ये आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध आमदार महेश शिंदे अशी थेट लढत झाली. त्यापैकी 14 ग्रामपंचायतीचे सरपंच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निवडून आल्याचे सांगण्यात आले, त्यामध्ये एकंबे, वडाचीवाडी, सांगवी, जांब खुर्द, अंबवडे संमत कोरेगाव, धुमाळवाडी (नांदगिरी), गुजरवाडी (पळशी), जरेवाडी, वाघजाईवाडी, चिमणगाव, कवडेवाडी, रामोशीवाडी, आसगाव व शिरंबे या गावांचा समावेश आहे.
आमदार महेश शिंदे गटाकडून देखील जास्त ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा केला जात आहे. त्यापैकी 12 ग्रामपंचायतींचे सरपंच हे आमदार महेश शिंदे गटाकडून निवडून आले आहेत. कुमठे, बर्गेवाडी, खडखडवाडी, हिवरे, जळगाव, बनवडी, पिंपोडे खुर्द, सुलतानवाडी, गोळेवाडी, शेल्टी, अनभुलेवाडी व आसगाव या ग्रामपंचायतीचे सरपंच या गटाची निवडून आले आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयश्री मिळवण्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेससह भाजपने केला आहे. नागझरी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्या पॅनेलने सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. सलग सहाव्यांदा त्यांनी विजय मिळवला असून विरोधकांना केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले आहे. एका अपक्ष उमेदवाराची लॉटरी लागली असून तो विजयी झाला आहे.
माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विचारांच्या अनेक ग्रामपंचायती निवडून आल्या असल्याचे सांगण्यात आले. भाजपचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव पाटील यांनी मात्र आठपैकी सात जागांवर भाजप प्रणित आघाडीने यश मिळवला असल्याचा दावा केला आहे. फलटण राखीव मतदार संघात समाविष्ट असलेल्या नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाबरोबरच शिवसेना-भाजपने विजय मिळवलेल्या दावा केला आहे.
भावेनगर, करंजखोप, मोरबेंद, आसनगाव, रणदुल्लाबाद या गावांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरपंच निवडून आले आहेत. विखळे येथे सरपंचपदासाठी समसमान मते पडल्याने चिठ्ठी काढण्यात आली, त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. पिंपोडे बुद्रुक येथे सर्वच पक्षांच्या आघाडीने यश मिळवले आहे. वाघोली, नायगाव येथे शिवसेनेचे विजय संपादन केला आहे, तर जाधववाडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाने यश मिळवले आहे.
कुमठे येथे आमदार महेश शिंदे व आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन पॅनेलमध्ये निवडणूक झाली होती. आ शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल ला बहुमत मिळाले असले तरी सरपंच पदावर आ. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार निवडून आला आहे.





