मुंबई शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार; शिवाजीराव नलावडे यांना मिळाली संधी

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई शिक्षक मतदार संघातून शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाजीराव नलावडे यांच्यासाठी छगन भुजबळ यांनी देखील आग्रह धरल्याचे पाहायला मिळाले होते.
त्यानंतर, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शिक्षक मतदारसंसाठी शिवाजीराव नलावडे यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ या पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत शिवाजीराव नलावडे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेण्यात आला.
शिवाजी नलावडे हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक व जिल्हाध्यक्ष राहिलेले असून, महाराष्ट्र राज्यातील सहकार चळवळीमध्ये त्यांचे मोगदान मोलाचे राहिलेले आहे. गेले ३० वर्षे आशिया खंडातील अग्रस्थानी नसलेली मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक म्हणून ते कार्यरत आहेत.
दरम्यान, नलावडे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच बेबनाव निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे. त्याचे कारण महायुतीतील घटक पक्षांत चर्चा होणे अपेक्षित होते. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे ठिणगी पडली का अशी शंका घेतली जाते आहे. दोन्ही पक्षांच्या कोणत्याही नेत्याने अद्याप याबाबत भाष्य केलेले नाही.





