मुंबईत ‘एनसीबी’ची मोठी कारवाई; गांजा, एमडी, एलएसडी ड्रग्स मोठ्या प्रमाणात जप्त

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाची पाळमुळे शोधण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत पाच ठिकाणी छापे टाकत धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 6 किलो गांजासह एमडी आणि एलएसडी ड्रग्स मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहे. तर 5 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात 1 ड्रग्स पॅडलर तर 4 सप्लायर्सचा समावेश आहे.
मुंबई आणि परिसरात पाच ठिकाणी आज एनसीबीने छापे टाकत कारवाई केली. या कारवाईत बॉलिवूड निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरातून एनसीबीने 10 ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत. तसेच ड्रग्जप्रकरणी फिरोज व त्यांच्या पत्नीची एनसीबीकडून चौकशी सुरू आहे.
समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कोपरखैराणे या भागात छापेमारी केली. दरम्यान, बॉलिवूडमधील ड्रग्जप्रकरणी एनसीबीने आतापर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची चौकशी केली आहे. यामध्ये श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, रकुलप्रीत सिंग, सारा अली खान यांचा समावेश आहे.





