नगर । नयन तांदळेसह चौघांवर ‘मोक्का’

नगर (प्रतिनिधी) – सावेडी उपनगर भागात भिस्तबाग परिसरातील नयन राजेंद्र तांदळे याच्यासह त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी ही माहिती दिली.
नयन राजेंद्र तांदळे (वय-25 रा. भिस्तबाग चौक, नगर) याच्यासह विठ्ठल भाऊसाहेब साळवे (वय 27, रा. झापवाडी ता. नेवासे), अक्षय बाबासाहेब ठोंबरे (वय-23 रा. प्रेमदान, सावेडी), राहुल अशोक पवार (वय- 31), अमोल छगन पोटे (वय 28 दोघे रा. सुपा ता. पारनेर) अशी मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
25 डिसेंबर 2020 रोजी सुपा पोलीस ठाणे हद्दीत या टोळीने संघटीतपणे गुन्हा केल्याचे समोर आल्यानंतर या टोळी विरोधात मोक्काचा कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पाठविलेला मोक्काचा प्रस्तावाला महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांनी मंजुरी देत टोळीविरोधात मोक्काची कारवाई केली आहे. सुपा पोलीस ठाणे हद्दीत आठ, तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत पाच व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत एक, असे 14 विविध प्रकारचे गुन्हे या टोळीने केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे या टोळीविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक कटके यांनी सांगितले.




