नक्षलवाद्यांचा तळ सुरक्षा दलाच्या ताब्यात; 9 दिवसांची कठीण चढाई करून अखेर तिरंगा फडकावला

छत्तीसगड – छत्तीसगड – तेलंगणा सीमेवरील कर्रेगुट्टा हा डोंगराळ भाग बराच काळ नक्षलवाद्यांचा गड मानला जात असे. मात्र, आता हा भाग सुरक्षा दलाच्या ताब्यात आला आहे. ऑपरेशन संकल्प अंतर्गत 9 दिवसांची कठीण चढाई करून सुरक्षा दलाने हा भाग ताब्यात घेतला आणि तिथे तिरंगा फडकावला. या विजयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
कुर्रेगट्टा हा भाग समुद्र सपाटीपासून जवळपास 5 हजार फूट उंचावर आहे. हा डोंगर बऱ्याच काळापासून नक्षलवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मीच्या बटालियन नंबर 1 चे प्रमुख ठिकाण होते. या ठिकाणी जवळपास 500 ते 1000 नक्षलवादी लपलेले होते.
हा भाग हिडमा, देवा, दामोदर, आजाद आणि सुजाता अशा प्रमुख नक्षलवादी कमांडरचे केंद्र राहिले आहे. 21 एप्रिलपासून सुरू झालेल्या ऑपरेशन संकल्पमध्ये जवळपास 10 हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. यात छत्तीसगड पोलीस, तेलंगणा पोलीस, सीआरपीएफ, कोब्रा बटालियन, एसटीएफ, डीआरजी आणि बस्तर फायटर्सचा समावेश आहे.
या अभियानात विशेषरित्या प्रशिक्षित केलेल्या 500 जवानांना हेलिकॉप्टरच्या मदतीने तेथे उतरवण्यात आले. 40-45 डिग्री तपमान, दुर्गम रस्ते आणि नक्षलवाद्यांनी जागोजागी टाकण्यात आलेले आयईडी (इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस) त्यांना चुकवत जवानांनी उल्लेखनीय कामगिरी करत नक्षलवाद्यांना तेथून हुसकून लावले.
मात्र, या मोहिमेत दोन जवान आयईडी स्फोटात जखमी झाले. तर काहींना प्रचंड उन्हामुळे डिहायड्रेशनचा त्रास झाला. कर्रेगुट्टा जंगल नक्षलवाद्यांचे ब्लॅक फॉरेस्ट म्हणून ओळखले जाते. हा भाग एवढा घनदाट आणि दुर्गम आहे की, संध्याकाळी 4 वाजता देखील अंधार पडतो. अशा भागात जाऊन सुरक्षा दलाने ही मोहीम फत्ते केली आहे.





