हैदराबाद: नक्षलवादाचा बीमोड करण्याच्या मोहिमेत सुरक्षा दलांनी एक मोठी कामगिरी फत्ते केली आहे. कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमाचा जवळचा सहकारी आणि जहाल माओवादी कमांडर बर्से देवा उर्फ साईनाथ याने तेलंगणाचे पोलीस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. बर्से देवावर शासनाने २५ लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. बर्से देवा हा नक्षलवाद्यांच्या सर्वात घातक ‘बटालियन नंबर १’ चा प्रमुख होता. नोव्हेंबर २०२५ मध्ये हिडमा मारला गेल्यानंतर देवानेच ‘पीपुल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी’च्या (PLGA) सशस्त्र कारवायांची सूत्रे हाती घेतली होती. सुकमा जिल्ह्यातील पुवर्ती गावचे रहिवासी असलेल्या या दोघांनी मिळून २०१३ चा दरभा खोऱ्यातील भीषण हल्ला आणि २०२१ चा सुकमा-बीजापूर हल्ला यांसारख्या अनेक रक्तरंजित घटनांचा कट रचला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांच्या वाढत्या दबावामुळे देवाच्या नेतृत्वाखालील बटालियन पूर्णपणे खिळखिळी झाली होती. गुरुवारी संध्याकाळी आपल्या काही सहकाऱ्यांसह छत्तीसगडमधून तेलंगणात प्रवेश केल्यानंतर त्याने शरणागती पत्करली. आत्मसमर्पणावेळी त्याच्याकडून एक ‘लाईट मशीन गन’ (LMG) जप्त करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांच्या रसद पुरवठ्यात आणि शस्त्रास्त्रांच्या खरेदीत देवाचा मोठा वाटा होता. त्याच्या चळवळीतून जाण्याने नक्षलवादी चळवळीला कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून, लाल आतंकवादाच्या अंताची ही महत्त्वाची पायरी मानली जात आहे.