नवाझ शरीफ यांची मुले करणार आत्मसमर्पण

नवी दिल्ली – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या दोन्ही मुलांनी भ्रष्टाचार प्रकरणी कायद्यासमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यासाठी दोघांनी उत्तरदायित्व न्यायालयाशी संपर्क साधला आहे.
पनामा पेपर्सच्या एकूण ३ प्रकरणांमध्ये हुसेन नवाझ आणि हसन नवाझ या दोघांच्याही विरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. या दोघांनाही १२ मार्चपूर्वी उत्तरदायित्व न्यायालयासमोर हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे दोघे अनुक्रमे सौदी अरेबिया आणि ब्रिटनचे रहिवासी आहेत. अव्हेनफिल्ड अपार्टमेंटस, अल अझिझिया आणि फ्लॅगशीप इन्व्हेस्टमेंट या ३ प्रकरणांमध्ये नवाझ शरीफ, त्यांच्या कन्या मरियम नवाझ आणि निवृत्त कॅप्टन सफदर यांच्या बरोबर या दोघांनाही आरोपी करण्यात आले आहे. सुनावणीला उपस्थित न राहिल्यामुळे हुसेन आणि हसन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावले गेले आहे.





