Pakistan News: नवाज शरीफ पुन्हा झाले पीएमएल-एन पक्षाचे अध्यक्ष

लाहोर – तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले नवाज शरीफ हे सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गट या पक्षाचे अध्यक्ष झाले आहेत. पनामा पेपर्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कोणतेही सार्वजनिक पद स्वीकारण्यास अपात्र ठरवल्यामुळे त्यांना पक्षाध्यक्ष पद सोडून द्यावे लागले होते. आज पक्षाच्या सर्वसाधारण कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ते पक्षाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडले गेले. शरीफ यांना पुन्हा अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर केला गेला आहे.
चार वर्षे लंडनमध्ये राहिल्यानंतर नवाज शरीफ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानमध्ये परत आले आहेत. पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या ११ सदस्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते, तरी नवाझ शरीफ यांची निवड बिनविरोध करण्यात आली. सिंह आपला हक्काचा वाटा घेण्यासाठी परत आला आहे, असे पक्षाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर म्हटले गेले आहे.
पीएमएलृएन पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक ११ मे रोजी घेतली जाणार असे पूर्वी जाहीर केले गेले होते. मात्र पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश बनल्याच्या घटनेला २६ वर्षे पुर्ण झाल्याचा आनंदोत्सव आज (२८ मे) रोजी असल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. पाकिस्तानने २८ मे १९९८ रोजी ६ अणू चाचण्या घेतल्या होत्या. त्यावेळी नवाज शरीफ हेच पंतप्रधान होते.
कोणतीही निवडणूक न घेता शरीफ यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होईल, असे सूतोवाच पक्षाचे पंजाब प्रांताचे प्रदेशाध्यक्ष राणा सनाउल्लाह यांनी व्यक्त केले होते. नवाज शरीफ यांनी पक्षाचे अध्यक्ष बनावे यासाठी पंतप्रधान आणि नवाझ यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ यांनी अलिकडेच पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.





