नवाब मलिकांमुळे महायुती अडचणीत? भाजपच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

मुंबई : नवाब मलिक यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप आहेत, ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे, अशी स्पष्ट भूमिका मांडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास अजित पवारांना विरोध केला होता. मात्र, मलिक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मलिक यांनी अजित पवारांच्या बैठकीला हजेरी लावली. त्याचबरोबर विधानसभेतही ते सत्ताधारी बाकावर दिसले. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणूकीच्या तोंडावर भाजप काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
नवाब मलिक यांच्यामुळे भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे. भाजपने विरोध करूनही अजित पवारांनी नवाब मलिक यांना पक्षात ठेवले असून, अधिवेशनात मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याचे दिसले. आता अजित पवारांनी बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित होते.
याबाबत अजित पवार यांना विधीमंडळ परिसरात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अजित पवारांनी केवळ 3 शब्दांमध्ये उत्तर दिले. नवाब मलिक आता तुमच्यासोबत आले आहेत का? असा सवाल अजित पवारांना विचारण्यात आला. यानंतर अजित पवार म्हणाले, त्रास होतोय का? अजित पवारांनी दिलेल्या या उत्तरामुळे नवाब मलिक पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि खासकरुन महायुतीमध्ये सक्रिय होणार का? याबाबत उत्सुकता वाढली आहे.





