Dinesh Tripathi : नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी टांझानियाच्या दौऱ्यासाठी रवाना

नवी दिल्ली : नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी 5 दिवसांच्या दौऱ्यासाठी आज टांझानियाला रवाना झाले. टांझानियामध्ये होणाऱ्या एआयकेईवायएमई (आप्रिका इंडिया की मरीटाईम एन्गेजमेंट ऑफ दार एस सालेम) या नौदल युद्ध सरावाला ते उपस्थित राहणार आहेत. या युद्धसरावाचे आयोजन भारतीय नौदल आणि टांझानियाच्या पीपल्स डिफेन्स फोर्सेसकडून संयुक्तपणे केले जात आहे.
आफ्रिकेतील काही देशांचे नौदल देखील या नौदल युद्धसरावामध्ये सहभागी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्लोबल साउथसोबतच्या नवीन दृष्टिकोनाच्या अनुषंगाने आफ्रिका खंडासोबत भारताचे सागरी सुरक्षा सहकार्य वाढवणे हे या युद्धसरावाचे उद्दिष्ट आहे. गेल्या महिन्यात मॉरिशसच्या भेटीदरम्यान मोदींनी जागतिक दक्षिणेशी भारताच्या संबंधांसाठी महासागर किंवा प्रदेशांमध्ये सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि समग्र प्रगती हा दृष्टिकोन जाहीर केला होता.
अॅडमिरल त्रिपाठी १२ ते १६ एप्रिल दरम्यान टांझानियाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत, असे भारतीय नौदलाने सांगितले. या भेटीचा उद्देश भारत आणि टांझानियामधील सागरी सहकार्य आणि धोरणात्मक संबंध मजबूत करणे आहे, यामुळे हिंद महासागर क्षेत्रात संरक्षण भागीदारी वाढवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर भर दिला जाईल, असे नौदलाने सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.





