परमार्थ : नवरात्रोत्सव…

देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. 1. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत. 2. शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते, पण तिथीचा क्षय झाल्यास ते आठ दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते. यंदाचे नवरात्र दहा दिवसांचे आहे.
वर्षभरात येणार्या काही विशेष नवरात्री- 1. चैत्र शुक्ल सप्तमी ते पौर्णिमा- सप्तशृंगी नवरात्र 2. शारदीय नवरात्र- आश्विन शुक्ल प्रतिपदा ते नवमी, जे सध्या सुरू असून जवळपास सर्व देशभर मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाते. 3. मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी किंवा अष्टमी ते पौर्णिमा- योगेश्वरी अंबेजोगाई नवरात्र 4. चंपाषष्ठीचे नवरात्र- मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी मार्तंड(खंडोबा) नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. यास खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात. 5. पौष शुक्ल सप्तमी/अष्टमी ते पौर्णिमा- शाकंभरीदेवी नवरात्र.
आज आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी (3 ऑक्टोबर) घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे. आज म्हणजे गुरुवारी ब्रह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पाचपासून दुपारी पावणेदोनपर्यंत घटस्थापना करता येईल. नवरात्रोत्सवातील महत्त्वाची असलेली ललिता पंचमी सोमवारी 7 ऑक्टोबरला असून पुढील गुरुवारी 10 ऑक्टोबरला घागरी फुंकून महालक्ष्मी पूजन करण्याचा दिवस आहे. शुक्रवारी 11 ऑक्टोबरला महाष्टमी आणि नवमीचा उपवास एकाच दिवशी करावयाचा आहे. शनिवारी 12 ऑक्टोबरला विजया दशमी म्हणजेच दसर्याच्या दिवशी नवरात्र समाप्ती होईल.
यंदा अशी अष्टमी 10 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री असल्याने तिथी वृद्धीमुळे दुर्गाष्टमी 11 ऑक्टोबर रोजी आहे. विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन हे 12 ऑक्टोबर रोजी आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जात असल्याने या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक घर खरेदी, गाडी खरेदी इत्यादींसह नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. यंदा दसर्याचा मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी 2 वाजून 22 मिनिटे ते 3 वाजून 9 मिनिटे या दरम्यान आहे.





