Pimpri : किवळे गावातील नवरात्रोत्सव

रावेत : पिंपरी चिंचवडमधील किवळे गाव हे नवरात्रोत्सवाच्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. गावातील ग्रामदेवी श्री जानुबाई माता देवीची स्थापना अठराव्या शतकातील पेशवे काळात झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर परंपरेने दरवर्षी देवीचा भंडारा कार्यक्रम आयोजित केला जातो.
गावातील अख्यायिकेनुसार, किवळ्याचे ग्रामदैवत श्री बापदेव महाराज आणि श्री जानुबाई माता हे भाऊ-बहीण मानले जातात. त्यामुळे नवरात्रोत्सवाला गावकऱ्यांसाठी विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे.
नवरात्राच्या सुरुवातीला गावात मोठ्या उत्साहात घटस्थापना केली जाते. या निमित्ताने श्री बापदेव महाराज ट्रस्ट व समस्त ग्रामस्थांच्या पुढाकाराने दांडिया, घरबा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तरुणाई आणि महिला वर्ग या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात. नवरात्रीच्या शेवटच्या टप्प्यात होम-हवन पार पडते.
त्यानंतर शिवशक्ती मित्र मंडळातर्फे भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यावेळी गावकरी तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. किवळे गावातील नवरात्रोत्सव हा धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि गावातील ऐक्य जपणारा उत्सव ठरत असून, वर्षानुवर्षे तो अधिक उत्साहात साजरा होत आहे.





