Navi Mumbai : नवी मुंबईने देशातील सर्वात स्वच्छ शहराचा पटकावला मान; सुरतला टाकले मागे
Navi Mumbai : नवी मुंबईला देशात प्रथम क्रमांकावर पोहोचविण्यासाठी महापालिकेने गेल्या काही वर्षांत स्वच्छता व्यवस्थेचे स्वरूप अधिक सक्षम केले.

Navi Mumbai : नवी मुंबईने केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’मध्ये देशातील ४,७५१ शहरांना मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सुरत आणि विजयवाडा यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता की नई पहल – बढ़ाएं हाथ, करें सफाई साथ’ या संकल्पनेतून दहावे स्वच्छ सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते. स्वच्छतेच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या नवी मुंबईने यात पहिला मान पटकावला आहे.
दिल्ली येथे आयोजित १०व्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी मुंबईला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यात नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहराचा बहुमान मिळवितानाच कचरामुक्त शहर (जीएफसी) आणि वॉटर प्लस ही मानांकनेही कायम राखली आहेत. नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
संपूर्ण प्रक्रियेत सुधारणा
स्वच्छ सर्वेक्षणातील क्रमवारीत सातत्याने अग्रभागी राहणाऱ्या नवी मुंबईला देशात प्रथम क्रमांकावर पोहोचविण्यासाठी महापालिकेने गेल्या काही वर्षांत स्वच्छता व्यवस्थेचे स्वरूप अधिक सक्षम करण्यावर भर दिला. केवळ रस्ते झाडणे आणि कचरा उचलणे एवढ्यापुरते स्वच्छतेचे नियोजन मर्यादित न ठेवता कचरा निर्माण झाल्यापासून त्याची अंतिम विल्हेवाट लावेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली.
शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा आणि निवासी परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच कचरा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. महापालिकेची स्वच्छता यंत्रणा, सफाई कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश मानले जात आहे.
Sunil Tatkare : ‘संजय राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलंय’; सुनील तटकरेंचा बोचरा वार




