Pune News : पुण्यातील नवले पुल परिसरात झालेल्या तीव्र रास्ता रोको आंदोलनानंतर पोलिसांनी अखेर हस्तक्षेप करत आंदोलकांना हटवले आणि सुमारे चार तासांनंतर मुंबई-बंगळूरू महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. (Pune News) नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ संतप्त नातेवाईक व नागरिकांनी नवले पुलावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आंदोलकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवत महामार्ग रोखून धरला होता. या आंदोलनामुळे सायंकाळी पाचच्या सुमारास सुरू झालेली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि तब्बल 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. (Pune News) परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर आंदोलकांची धरपकड करत रस्ता मोकळा करण्यात आला. (Pune News) या वेळी वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीडित कुटुंबीयांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, अंत्यसंस्कारासाठी मृतदेह वैकुंठ स्मशानभूमीत नेण्यात उशीर झाला. (Pune News) या आंदोलनामुळे कार्यालयीन वेळेतच वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना तासन्तास त्रास सहन करावा लागला. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. (Pune News)