पुरोगामी महाराष्ट्राचा हक्काचा पक्ष!

Updated On:
पुरोगामी महाराष्ट्राचा हक्काचा पक्ष!

हाराष्ट्रात २०१९च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला होता. राज्याच्या राजकारणाविषयी अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते. विरोधी पक्ष औषधाला पण उरणार नाहीत, असे दावे सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत होते. एसी रुममधील चर्चांकडे दुर्लक्ष करीत एक नेता संपूर्ण राज्य पिंजून काढत होता. त्यातच मतदानाला दोन दिवस असताना साताऱ्यात सभा होती आणि या सभेमध्ये पाऊस आला. पावसामध्ये भिजत या नेत्याने मतदारांना आवाहन केले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि निवडणुकीचे चित्रच बदलून गेले. आपले राज्य पुरोगामी आहे, आपला महाराष्ट्र सर्वांना सोबत घेऊन जाणारा म्हणून ओळखला जातो. ही ओळख जपण्यासाठी एक नेता वयाच्या ८०व्या वर्षीही लढत आहे, आपल्याला त्याला साथ द्यायची आहे, हा संदेश सर्वत्र गेला आणि मतदानातून चमत्कार झाला. या महान नेत्याचे नाव म्हणजे शरदचंद्र गोविंदराव पवार.

पवारसाहेबांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेनंतर घडलेला इतिहास सर्वांनाच माहीत आहे. हा केवळ इतिहास नाही, तर राज्याच्या राजकारणातील एक मैलाचा दगड ठरला आहे. शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज १० जून रोजी २६ वर्षे पूर्ण झाली असून, पक्ष २७व्या वर्षात पदार्पण करत आहे. साहेबांचे सर्वाधिक प्रेम असलेल्या पुण्यनगरीत हा वर्धापनदिन साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाची वाटचाल आणि विचार नजरेसमोर तरळतो.

साताऱ्यातील २०१९च्या सभेपूर्वी व्यक्त केली जाणारी आव्हाने आणि त्याविरुद्धचा संघर्ष कदाचित राज्यातील युवा पिढीसाठी नवीन होता. मात्र, शरद पवारसाहेब यांची ६७ वर्षांची राजकीय कारकीर्द माहीत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी त्यांनी केलेला हा संघर्ष नवीन नव्हता. प्रवाहाच्या विरुद्ध जाताना संघर्ष अटळ आहे आणि या संघर्षानंतरच नव्या क्षितिजापर्यंत पोहोचता येते, या विश्वासावर शरद पवार साहेबांनी आतापर्यंतची वाटचाल केली आहे आणि त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी हीच शिकवण देऊन घडविले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासूनचा प्रवास पाहिला, तर पवार साहेबांच्या धोरणी नेतृत्वामुळे महाराष्ट्रासह १५-१६ राज्यांमध्ये पक्षाचा झालेला विस्तार देशाने पाहिला आहे. शरद पवार साहेब, दिवंगत पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. पक्षाच्या स्थापनेनंतर चार महिन्यांमध्येच राज्यात विधानसभा निवडणूक झाली आणि या निवडणुकीत लक्षणीय यश मिळवीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांची आघाडी सत्तेवर आली. त्यानंतर या पक्षाने मागे वळून पाहिलेच नाही. तत्कालीन राजकारण आणि युतीला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या विचारातून शरद पवार साहेबांनी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली.

पवार साहेबांच्या राज्यातील लोकप्रियतेची चुणूक पहिल्याच निवडणुकीत देशाने पाहिली होती. त्यामुळे, तरुणांचा ओढा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. अशा तरुणांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर ठेवण्यासाठी माध्यमांमध्ये बातम्या पेरल्या जात होत्या. कधी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार, तर कधी काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार, अशा बातम्या सारख्या येत होत्या. पण, पक्षाच्या राज्यातील वाटचालीवर त्याचा कोणताच परिणाम झाला नाही. उलट, २००४च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयाला आला.

त्यानंतरही २००९मध्ये पक्षाची कामगिरी चांगलीच राहिली. या काळामध्ये तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, गुजरात, गोवा, झारखंड, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल व आसाम या राज्यांसह ईशान्येतील मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश या राज्यामध्येही पक्षाने निवडणुकीत उत्तम कामगिरी करीत आमदार निवडून आले. तर लक्षद्वीप व बिहारमधून सातत्याने खासदार निवडून येत राहिला, तर अन्य राज्यांमध्ये पवार साहेबांना आणि साहेबांच्या पुरोगामी विचारांना मानणारे कार्यकर्ते पक्षाची ताकद वाढवित होते.

संघर्ष आणि आव्हाने हा राजकीय जीवनाचा अविभाज्य भाग असतो, त्याप्रमाणे २०१४च्या निवडणुकीत पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरही पक्ष ढासळणार नाही आणि विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस जबाबदारी काम पाहील, याची काळजी शरद पवार साहेबांनी घेतली. सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने विरोधी पक्षांवर दबाव आणण्यात येत होता. त्यातून नेत्यांच्या मागे चौकशांचा फेरा लावण्यात येत होता. या दबावातून अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. पक्ष अस्तित्वात राहतो की नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. मात्र, अशा चर्चा पवार साहेबांसाठी नव्या नव्हत्या आणि त्यांच्या मनातील विचार कायम होता.

या चर्चांना उत्तरे देत बसण्यापेक्षा ते राज्यामध्ये फिरत होते. तरुणांचे प्रश्न समजून घेत होते, शेतकऱ्यांच्या समस्यांवर काय तोडगा निघू शकतो, हा विचार त्यांच्या मनामध्ये होता. जनतेच्या मनामध्ये असणारा असंतोष त्यांच्या अनुभवी नजरेतून टिपला जात होता. त्यातूनच २०१९ची निवडणूक लागली आणि कायम जनतेमध्ये रमणारा, जनतेची नस ओळखणारा, त्यांच्यात विश्वास निर्माण करणारा आणि ‘मी आहे ना!’ हा आधाराचा शब्द देणारा हा लोकनेता पुन्हा पायाला भिंगरी लागल्यासारखा राज्यभरात फिरला.

एखादा खासदार आणि २० – २२ आमदार एवढ्यापुरताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष उरेल, अशी भाकिते राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली होती. पण, पवार साहेब त्या सर्वांना पुरुन उरले. त्यात साताऱ्याची सभा कळसाध्याय ठरली आणि राज्याचा निकाल ‘वेगळा’ लागला. कोणत्याही राजकीय तज्ज्ञाने अंदाज वर्तविला नसेल, पण पवार साहेबांच्या व्यूहनीतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष एकत्र आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावर बसवून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. हे अभूतपूर्व सत्तांतर केवळ पवार साहेबांमुळेच झाले, हे कोणीही नाकारु शकणार नाही.

सर्व विधिनिषेध बाजूला ठेवून, राजकीय पक्ष फोडण्याच्या दोन घटना राज्यात घडल्या. त्यामध्ये दबावतंत्रातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचेही दोन गट झाले. अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीन तासांत पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पवार साहेबांना प्रश्न विचारण्यात आला, की ‘तुमच्या पक्षातील अनेक नेते सोडून गेले आहेत. आता तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोणता?’ तत्काळ त्यांनी उंचावला आणि ते उद्गारले, ‘शरद पवार.’ ही गोष्ट खरी आहे, पक्षाच्या २७ वर्षांच्या या प्रवासामध्ये शरद पवार हाच पक्षाचा आश्वासक चेहरा होता आणि त्या चेहऱ्याच्या बळावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचला आहे.

या पक्षाला राजकीय ओळख देतानाच, त्याला वैचारिक अधिष्ठान आणि पुरोगामी दिशा देण्याचे कामही पवार साहेबांनी केले आहे. त्यामुळेच, मूळ पक्षाबरोबरच पुरोगामी चळवळीतील अन्य संस्था-संघटना व हा विचार मानणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठीही राष्ट्रवादी कॉंग्रेस कायम आपलासा वाटत आला आहे. त्यामुळेच, गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाला नवे नाव, नवे चिन्ह घेऊन निवडणुकीत उतरावे लागले तेव्हा पक्षाची कामगिरी काय असेल, अशी शंका घेण्यात येत होती. मात्र, पक्षाने १० जागा लढवत आठ जागांवर विजय मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने सरासरी ६० ६५ जागा जिंकण्याची कामगिरी केली आहे. मात्र, ८० टक्क्यांपर्यंत ‘स्ट्राइक रेट’ असणारा राजकीय पक्ष ही घटना दुर्मिळातील दुर्मीळ मानावी, अशी आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी अपेक्षित झाली नाही आणि त्यामागची कारणे काय आहेत, हे सर्व जनतेला माहीत आहेत. पण, एखाद्या पराभवानंतर पक्ष कसा उभा करायचा, हे माहिती असणारा शरद पवार साहेबांशिवाय दुसरा चांगला नेता कोण असू शकतो? त्यामुळे, पवार साहेब तेव्हापासूनच कामाला लागले आहेत.

आज पक्ष राज्यपातळीवर वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करत असला, तरीही सर्वसामान्य जनतेच्या, ग्रामीण भागातील, शहरांमधील महाराष्ट्राला धर्मवादी- जातियवादी विखाराच्या जाळ्यात जाऊ न देण्याचा विचार करणारा वर्ग शरद पवार साहेबांच्या पक्षाकडे आस लावून बसला आहे. ही सर्वसामान्य

कार्यकर्त्यांसाठी जमेची बाब आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष निश्चित चमकदार कामगिरी करेल, याची खात्री आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीबरोबरच पवार साहेबांच्या आतापर्यंतच्या ६७ वर्षांच्या राजकीय वाटचालीमध्ये वैचारिक आणि पुरोगामी चेहरा म्हणून महाराष्ट्र आणि देशाने त्यांची नोंद घेतली आहे. राजकीय प्रलोभने किंवा दबाव असतानाही, त्यांनी पुरोगामित्वाची वाटचाल सोडली नाही. खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांचा हा वारसा पुढे सुरु ठेवला आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडणारा पुरोगामी चेहरा कायम जपला पाहिजे, हा सिद्धांतच पवार साहेबांनी मांडलेला सिद्धांत आहे. त्यामुळे सध्याची लढाई अवघड असली, तरी अशक्य नाही, हे विश्वासाने सांगावेसे वाटते. वैचारिक व पुरोगामित्व मानणारा वर्ग मोठा आहे. हाच वर्ग अभूतपूर्व बदल घडवून दाखवेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत महाराष्ट्राने धार्मिक- सांप्रदायिक दादागिरी सहन केलेली नाही. हा देश वैचारिक व पुरोगामी चळवळींचा आहे, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच सामान्य नागरिकांसाठी शरद पवार साहेब हे नावच आश्वासक व न्याय्य आहे. सामान्य माणसांना न्याय देण्यासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरु शकतात, हा विश्वास जनतेमध्ये आहे. त्यामुळे भविष्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणखी भरारी घेईल आणि निश्चितच चांगली कामगिरी करून दाखवेल, राष्ट्रीय पक्ष म्हणून स्थान मिळविण्याच्या निकषांपर्यंत पोहोचेल, याविषयी आमच्या मनात कोणतीही शंका नाही.

Prashant Jagtap (@prashantjagtapspeaks) • Instagram photos and videos
– प्रशांत जगताप (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, पुणे.)

आणखी संबंधित बातम्या

Operation Tiger 3 : 'ऑपरेशन टायगर'च्या तिसऱ्या अंकांची तयारी सुरू? ठाकरेंसह राष्ट्रवादीचे आमदार, नगरसेवकही शिंदेंच्या संपर्कात???

2026-07-10 15:08:25

Operation Tiger 3 : 'ऑपरेशन टायगर'च्या तिसऱ्या अंकांची तयारी सुरू? ठाकरेंसह राष्ट्रवादीचे आमदार, नगरसेवकही शिंदेंच्या संपर्कात???

Sharad Pawar: "उद्धव ठाकरेंच्या पक्षासारखी अवस्था शरद पवारांच्या पक्षाची होऊ शकते"; बड्या नेत्याचा दावा

2026-07-10 10:18:42

Sharad Pawar: "उद्धव ठाकरेंच्या पक्षासारखी अवस्था शरद पवारांच्या पक्षाची होऊ शकते"; बड्या नेत्याचा दावा

Ajit Pawar : मोठी मागणी..! अजित पवार यांना 'मरणोत्तर पद्मविभूषण' द्या; राष्ट्रवादीच्या आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

2026-07-09 19:32:33

Ajit Pawar : मोठी मागणी..! अजित पवार यांना 'मरणोत्तर पद्मविभूषण' द्या; राष्ट्रवादीच्या आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

Top 10 News : ठाकरेंनंतर आता शरद पवारांनाही धक्का? ते अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा पेटला...; वाचा आजच्या दहा बातम्या

2026-07-09 19:06:37

Top 10 News : ठाकरेंनंतर आता शरद पवारांनाही धक्का? ते अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा पेटला...; वाचा आजच्या दहा बातम्या

Sharad Pawar : 34 वर्षांनी विधानभवात एन्ट्री; एकनाथ शिंदेच्या दालनात जाऊन भेट, पवारांनी नेमका कोणता संदेश दिला?

2026-07-09 11:06:16

Sharad Pawar : 34 वर्षांनी विधानभवात एन्ट्री; एकनाथ शिंदेच्या दालनात जाऊन भेट, पवारांनी नेमका कोणता संदेश दिला?