Sharad Pawar: “उद्धव ठाकरेंच्या पक्षासारखी अवस्था शरद पवारांच्या पक्षाची होऊ शकते”; बड्या नेत्याचा दावा
Sharad Pawar: शशिकांत शिंदे आणि बजरंग सोनावणे यांनी आरोप फेटाळले.

Sharad Pawar: ठाकरे गटाचे खासदार फुटल्यानंतर आता शरद पवार यांच्या पक्षातील खासदार देखील फुटणार असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ असून, उद्धव ठाकरे यांच्या पक्षासारखी अवस्था शरद पवारांच्या पक्षाची होऊ शकते’ असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “शरद पवार यांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ आहेत, काय करतील माहिती नाही. मोदी शाह सरकार हात धुवून लागलेलं आहे, विरोधी पक्ष अस्तित्वात नसावा, अशी त्यांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे केलं ते पवार साहेबांच्या एनसीपीत होऊ शकतं. खासदार सोडून जातील की नाही मात्र अस्थिर आहेत, असं ऐकतोय,” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
शरद पवार गटाने आरोप फेटाळले
परंतु पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार बजरंग सोनावणे यांनी फेटाळून लावले आहेत. शशिकांत शिंदे यांनी आमचा पक्ष एनडीएसोबत जाणार नसल्याचं म्हटले आहे.
ते म्हणाले, “अलिकडेच पक्षाचे सर्व आमदार आणि खासदारांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली असून सर्वजण पक्षाशी एकनिष्ठ आहेत. चर्चांमध्ये तथ्य नाही, एनडीएमध्ये जाण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा सुरू नाही आणि तसा कोणताही विषय उद्भवू शकत नाही.आगामी काळात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय राखण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू.” Sharad Pawar
तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी, “आमच्या पक्षातील कोणताही खासदार अस्वस्थ नाही. आम्ही आठ खासदार एकसंघ आहोत. आम्ही सर्व जण सुप्रिया ताईंच्या नेतृत्त्वात सभागृहात काम करतो. आदरणीय साहेबांच्या आदेशानं, सहकार्यानं काम करत आहोत.”
आम्हाला ऑफर यायचा प्रश्न नाही, आम्ही ऑफरच्या पलीकडे आहोत, त्यामुळं आम्हाला ऑफर यायचा प्रश्न नाही. कोणी काही दावा करेल, त्यामुळे ते काय दावा करतात, त्याबाबत त्यांनाच विचारलं पाहिजे. त्यांना कोण भेटलं? आमच्या खासदारांपैकी किमान ६ खासदारांचा तरी मोबाईल नंबर त्यांच्याकडे असेल का?
आमची ओळख तरी पृथ्वीराज चव्हाण यांना असेल का? आम्ही राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व खासदार हे शरद पवार यांच्याबरोबर आहोत. आम्ही १०० टक्के शरद पवार यांची साथ सोडणार नाही,” असेही ठामपणे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले. Sharad Pawar
हेही वाचा:







