National Sports Day : यशासाठी शॉर्टकट नसतो
भारतीय ऑलिम्पिक संघटनेची सूत्रे हाती घेतल्यापासूनच मी हे ठरवले की केवळ मी अॅथलेटिक्सशी संबंधित आहे, म्हणून त्याकडेच लक्ष द्यायचे असे नव्हे, तर सर्वच खेळांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहायचे.

National Sports Day : भारतीय ऑलिम्पिक संघटनेची सूत्रे हाती घेतल्यापासूनच मी हे ठरवले की केवळ मी अॅथलेटिक्सशी संबंधित आहे, म्हणून त्याकडेच लक्ष द्यायचे असे नव्हे, तर सर्वच खेळांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहायचे. खेळाडूंनी विविध खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय पदकांच्या संख्येत वाढ करावी, तसेच ऑलिम्पिक स्पर्धेतही आपला दबदबा निर्माण करावा व भारताला जागतिक क्रीडा क्षेत्रातील सुपरपॉवर बनवावे. यासाठी एक संघटना म्हणून जे सहकार्य हवे असेल ते सर्व देणे हे माझे पहिले कर्तव्य आहे.
खेळाडूंना एकच सांगावेसे वाटते, की यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. त्यासाठी अथक प्रयत्न व परिश्रमच करावे लागतात. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. चुका सुधारून अधिक मजबूत होऊन पुनरागमन करणे हे खेळाडूने लक्षात घेतले पाहिजे. आपल्या देशात गुणवत्तेची अजिबात कमतरता नाही. गरज आहे ती शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातीलही गुणवान खेळाडूंना शोधून त्यांना योग्य व्यासपीठ व सुविधा उपलब्ध करून देण्याची.
तेच आम्ही सध्या करत आहोत. खेळ कोणताही असो जर त्यात काही प्रशासकीय स्तरावर उणिवा असतील तर त्या दूर करणे आमचे काम आहे. खेळाडूंनी केवळ खेळाकडे व आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. 1984 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये माझे पदक थोडक्यात हुकले होते. तेव्हा मी खूप निराश झाले होते. परंतु त्यानंतर मी स्वतःला सावरले. त्यानंतर मी अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली.
त्यामुळे अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे खेळाडूंनी लक्षात घेतले पाहिजे. त्यातच आता केंद्र सरकारने क्रीडा विधेयक पारित केले आहे, ही एक चांगली बाब ठरणार आहे. देशातील प्रत्येक क्रीडा संघटनांतील बेशिस्त दूर होऊन कामकाजात पारदर्शकता येईल व ही गोष्ट खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. संघटना, त्यातील पदाधिकारी, त्यात होणारे राजकारण व त्यामुळे खेळाडूंचे होणारे नुकसान या विधेयकातील तरतुदींमुळे दूर होणार आहे.
केवळ स्पर्धांचाच विचार करून चालणार नाही तर काटेकोर व तंत्रकुशल प्रशिक्षणही महत्त्वाचे बनले आहे. सध्याच्या आधुनिक काळात खेळाडूला टिकून राहायचे असेल तर अत्याधुनिक तंत्रज्ञान अंगिकारणे गरजेचे आहे. या नव्या गोष्टींमुळे खेळाडूंना आपल्या कामगिरीचे समीक्षण स्वतःच करता येते व चुका किंवा खेळातील दोष दूर करणे सहज शक्य होते.
प्रशिक्षण हा एक भाग झाला परंतु आपल्या प्रशिक्षकांनी दिलेले सल्लेही तेवढेच मोलाचे ठरतात. आधीच्या सामन्यांत काय झाले याचा विचार न करता पुढील सामन्यांत कामगिरी कशी सरस होईल, याचा विचार करणे हितावह ठरते. नेहमी सकारात्मक राहायचे व अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न सोडायचे नाहीत हीच यशाची गुरुकिल्ली ठरते.
आमच्या काळात एवढ्या सुविधा नव्हत्या त्यामुळे आम्हाला त्याचा लाभ झाला नाही, परंतु आता तशी परिस्थिती नाही. खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर सुविधा मिळतात, परदेशात जास्तीत जास्त स्पर्धा खेळण्याची संधी मिळते, त्यांना आर्थिक सुबत्ताही मिळते. त्यामुळे खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे शक्य होते, हे आधी लक्षात घेतला पाहिजे.
आम्ही एक संघटना म्हणून कोणत्याही खेळाला दुय्यम मानात नाही सगळे खेळ समान मानतो त्यामुळे यापुढेही प्रत्येक खेळात आपली प्रगती कशी साध्य होईल हे पाहण्याचे काम आमचे आहे व ते आम्ही करणारच आहोत; परंतु जे खेळाडूंच्या हाती आहे ते त्यांनी प्रामाणिकपणे केले तर यश निश्चितच मिळेल. राष्ट्रीय क्रीडादिनाच्यानिमित्ताने आपला देश आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात अग्रेसर बनलेला पाहायचा आहे.






