National Sports Day : क्रीडा शिक्षणाची गरज
जर प्रत्येक पालकाने असाच विचार केला असता तर सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा, महेश भूपती, विश्वनाथन आनंदसारखे खेळाडू आपल्याला लाभले असते का? त्यांच्या पालकांनीच त्यांना प्रोत्साहन दिले हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

National Sports Day : भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा शिक्षणही किती महत्त्वाचे आहे, हेच आपण लक्षात घेत नाही. प्रत्येकाला डॉक्टर, वकील, इंजिनिअर व्हावे असेच वाटते किंबहुना त्यांच्या पालकांचेच असे मत असते. मात्र, आपला पाल्य खेळाडू म्हणून नावारुपाला यावा ही मानसिकता अद्याप दिसत नाही. जर प्रत्येक पालकाने असाच विचार केला असता तर सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा, महेश भूपती, विश्वनाथन आनंदसारखे खेळाडू आपल्याला लाभले असते का? त्यांच्या पालकांनीच त्यांना प्रोत्साहन दिले हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
मलाही लहान वयापासूनच माझ्या वडिलांनी सातत्याने पाठिंबा दिला. त्यांनीच मला टेनिसचे प्राथमिक धडे गिरवायला लावले. त्यांनीच माझे अभ्यासाचे व खेळाचे वेळापत्रक तयार केले व त्यानुसारच सर्वकाही माझ्याकडून करून घेतले. सुरुवातीला मला त्याची सवय नसल्याने जड गेले, मात्र नंतर मनापासून टेनिसची आवड निर्माण झाली. याच खेळात देशाचे प्रतिनिधित्व करायचे हे निश्चित केले व सगळे अडथळे पार करत तो दिवस उगवला जेव्हा मी पहिल्यांदा देशाकडून आंतरराष्ट्रीय टेनिस खेळलो. तसेच जेव्हा विम्बल्डन या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मला यश मिळाले तेव्हा तर ही सगळी मेहनत फळाला आल्याचा आनंद झाला. अभिमानाने छाती फुलून आली.
भारतात क्रीडा चाहत्यांचा पाठिंबा प्रचंड असतो, त्यांची अशीच इच्छा असते, की आपल्या लाडक्या खेळाडूने सातत्याने जिंकलेच पाहिजे. काही वेळा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आपण कमी पडतो परंतु ही नकारात्मकता धुडकावून पूर्ण विश्वासाने पुढील सामना खेळण्यासाठी सज्ज होणे सर्वात महत्त्वाचे असते. त्यासाठी शालेय स्तरापासूनच क्रीडा शिक्षण हवे. त्या लहान वयात आपला खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो व पराभव स्वीकारण्याची मानसिकताही तयार होते त्यानंतर तो त्याच्या संपूर्ण आयुष्यात पराभवांची भीती बाळगत नाही. उलट विजयासाठी निकराचे प्रयत्न करायला शिकतो व देशासाठी अनेक यशस्वी विजय करतो.
प्रत्येक सामन्यात आणि स्पर्धेत आपले 100 टक्के योगदान देण्याची जिद्दच अशा खेळाडूला पुढे जाण्यास मदत करते. त्याचबरोबर खेळामुळे मुलांमध्ये नेतृत्वगुण तसेच सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते.
त्यासाठीच देशात खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी योग्य पायाभूत सुविधा व शालेय स्तरावर क्रीडा शिक्षणाची गरज भासते. तुम्ही इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, चीनसारखे देश पाहा. त्यांचे खेळाडू जागतिक क्रीडा क्षेत्रावर वर्चस्व राखत आहेत व त्यात सातत्याचाही समावेश असतो. या देशांमध्ये खरेतर क्रीडा संस्कृती रुजलेली पाहायला मिळते. हे आपल्याकडेही शक्य आहे. मात्र, त्यासाठी क्रीडा क्षेत्राशी संबंधित प्रत्येक गटाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
केवळ टेनिसच नव्हे, तर राष्ट्रीय क्रीडादिनाच्या औचित्याने असे सांगावेसे वाटते की, आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे व 1980 पासूनची ऑलिम्पिक सुवर्णपदकाची अपेक्षा येत्या काळात पूर्ण व्हावी. जगात शक्तिशाली देशांत आता भारताची गणना होऊ लागली आहे, याचा आनंद व अभिमान आहेच; परंतु भविष्यात भारत जागतिक क्रीडा महासत्ता व्हावा, अशी अपेक्षा आहे.
– लिएंडर पेस






