National Sports Day: खाशाबांनी गाजविलेला पहिला आखाडा
National Sports Day: कराड ते हेलसिंकी ऑलिम्पिकपर्यंतचा संघर्षाचा प्रवास; २३ जुलै १९५२ रोजी भारताला मिळवून दिले पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक.

National Sports Day: नाशिकच्या मैदानात हजारो लोक मानाची कुस्ती पाहण्यासाठी जमले होते. सकाळपासून त्र्यंबकेश्वराच्या भूमीत अखिल महाराष्ट्र कुस्त्यांचा आखाडा उत्साहात सुरू होता. एकही कुस्ती चितपट झाली नव्हती. दुपारी कराडचा एक तरुण मल्ल फडात जोड लावण्यासाठी आखाड्यात उतरला. छोट्या चणीचा तो मल्ल प्रथमच अखिल महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत खेळणार होता. या मल्लाची अंगकाठी किडकिडीत.
प्रथमदर्शनी तो पैलवान वाटतच नव्हता. फड भरविणार्यांहनी त्याला एक रुपयाचा जोड ठरवून आखाड्यात फिरवले. हा प्रकार अपमानास्पद होता. 51 रुपयांची जोड लावण्याची प्रथा असताना एका रुपयांची कुस्ती लावण्यात येणार होती. पाच मिनिटांनंतर प्रतिस्पर्धी मल्ल मिळाला. मुंबईच्या नामांकित पैलवान राक्षेबरोबर तो लढणार होता. कराडचा मल्ल लंगोटीनिशी तयार झाला. कराड विरुद्ध मुंबई कुस्तीची घोषणा झाली.
कराडच्या मल्लासमोर राक्षे धिप्पाड, कसलेला कुस्तीपटू. चितपट कुस्ती पाहण्यास मिळेल म्हणून सर्वांच्या नजरा राक्षेकडे वळल्या. पंचांनी कुस्ती लावली. दोघांनी जमिनीवरील माती हातात घेतली. हात हातात मिळवले. दंड थोपटले. कुस्ती सुरू झाली. कुस्ती सुरू होताच कराडच्या मल्लाने राक्षेचा एकेरी पट काढला. त्याने पहिल्याच मिनिटाला मुलतानी डावाचे अप्रतिम प्रदर्शन घडवले. क्षणात राक्षेची पाठ जमिनीला टेकली. अवघ्या पंधरा सेकंदात कुस्ती चितपट. प्रेक्षकांनी जोरात टाळ्या वाजवून कराडच्या मल्लाचे कौतुक केले. विजयी मल्लाने हात उंचावून अभिवादन स्वीकारले.
राक्षेला आपण कसे चितपट झालो हे समजलेच नाही. प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच कराडच्या मल्लाने बाजी मारली होती. ही कुस्ती पाहण्यास अनेक मान्यवर हजर होते. कुस्तीगिरांना वंद्य असलेल्या बडोद्याच्या माणिकरावांनी कराडच्या मल्लाचा चमत्कार पाहिला. त्यांच्या सराईत नजरेने कराडचा मल्ल किती तयार आहे हे त्वरित ओळखले. त्यांनी कराडच्या मल्लास विचारले की हा डाव पुन्हा करून दाखवशील का? तो मल्ल तयारच होता.
दुसरी 51 रुपयांची कुस्ती त्या मल्लाने त्याच डावावर तेवढ्याच वेळात जिंकली. पाठोपाठ तिसरा जोड 151 रुपयांचा ठरला. तीही कुस्ती तितक्याच सहजपणे आणि क्षणार्धात कराडच्या मल्लाने मारली. एकाग्रता, दृढनिश्चय आणि अफाट कुस्तीकौशल्याने कराडच्या मल्लाने उपस्थितांची मने जिंकली होती. कराडच्या नव्या दमाच्या मल्लाचा अचाट पराक्रम पाहून चकित झालेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कराडचा तो मल्ल पैशांसाठी कधीच आखाड्यात उतरला नव्हता. कुस्तीवर त्याचे मनापासून प्रेम होते.
कुस्ती हेच त्याचे जीवन होते. सलग तीन कुस्त्या जिंकल्यानंतर माणिकरावांनी कराडच्या मल्लास जवळ बोलावून शाबासकी आणि आशीर्वाद तर दिलाच, पण जमलेल्या सर्व लोकांना सांगितले की, मुलतानी डाव इतक्या सफाईने करणारा पैलवान माझ्या उभ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच पाहिला आहे. हा मुलगा कुस्तीमध्ये फार पुढे जाईल. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण खरी ठरली होती. तो मुलगा पुढे ऑलिम्पिकविजेता बनला.
अवघ्या चार वर्षांतच नाशिकचा आखाडा गाजविणार्यार कराडच्या के. डी. ऊर्फ खाशाबा जाधवांनी हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धा गाजवून माणिकरावांचे बोल खरे ठरवले होते. खाशाबा जाधवांच्या कराड ते हेलसिंकी ह्या जागतिक विजयापर्यंतच्या प्रवासात नाशिकची कुस्ती त्यांना प्रेरणा देणारी ठरली. शेवटपर्यंत संघर्ष करीत खाशाबांनी जागतिक यशाला गवसणी घातली होती. त्यांना कोणतेही यश सहजासहजी मिळाले नाही. पदोपदी झुंजावे लागले होते. अशा लढवय्या के. डी. जाधवांच्या जागतिक यशाची ही संघर्ष कथा लेखन करण्याचे भाग्य मला लाभले.
ऊणीपुरी 25 वर्षे सरली. मी लिहिलेल्या ऑलिम्पिकवीर खाशाबा पुस्तकाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. तरी खाशाबांचा कुस्तीतील पहिला विजय मलाही आज प्रेरित करतो. पारंपरिक मातीवरून कुस्तीतून सुरू झालेला प्रवास ऑलिम्पिक पदकापर्यंत सुरूच राहिला. 23 जुलै 1952 रोजी त्यांनी देशासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा इतिहास घडविला.
या पदकाचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. एक खदखद आजही कायम आहे. खाशाबांना पद्मभूषण पुरस्कार केंद्र शासनाने अद्याप दिला नाही. राज्याचे शिवछत्रपती पुरस्कार व केंद्राने अर्जुन पुरस्कार त्यांना मरणोत्तर दिले. यंदा तरी पद्मविभूषण पुरस्कार खाशाबांना मिळो ही राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त तमाम क्रीडाशौकिनांची अपेक्षा आहे.
– प्रा. संजय दुधाणे.






