National Sports Day : कै. रामचंद्र (आप्पा) बनकर शैक्षणिक व क्रीडा संकुल
सुमारे साडेचार एकर जागेवर उभारलेले हे पुणे महानगरपालिकेचे संकुल म्हणजे शिक्षण, क्रीडा, शिस्त आणि संस्कार यांचा सुंदर संगम ठरले आहे.

National Sports Day :
गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी उभे राहिलेले क्रीडा – संस्काराचे आधुनिक केंद्र
पुण्याच्या पूर्व भागातील सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही मोठी स्वप्ने पाहता यावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हडपसरच्या सातववाडी-गोंधळेनगर परिसरात उभे राहिलेले कै. रामचंद्र (आप्पा) बनकर शैक्षणिक व क्रीडा संकुल आज हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देत आहे.
सुमारे साडेचार एकर जागेवर उभारलेले हे पुणे महानगरपालिकेचे संकुल म्हणजे शिक्षण, क्रीडा, शिस्त आणि संस्कार यांचा सुंदर संगम ठरले आहे. या भव्य संकुलाच्या उभारणीमागे माजी नगरसेवक सुनील बनकर तसेच माजी महापौर व विद्यमान स्थायी समिती सदस्या वैशाली सुनील बनकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन आणि सहकार्यही या प्रकल्पाच्या उभारणीत निर्णायक ठरले.
अनुभवातून जन्माला आलेला संकल्प
नगरसेवक म्हणून काम करत असताना परिसरातील अनेक पालक आपल्या मुलांना चांगल्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळावा, यासाठी शिफारसपत्र घेऊन सुनील बनकर यांच्याकडे येत असत. मात्र एका विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी दिलेल्या शिफारसपत्राचा अवमान झाल्यानंतर त्यांनी या व्यवस्थेकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले. केवळ शिफारस करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यांच्या परिसरातच दर्जेदार शिक्षण आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असा विचार त्यांच्या मनात दृढ झाला.
त्यातूनच पूर्व भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक व क्रीडा संकुल उभारण्याचा संकल्प करण्यात आला. 2011 पासून या जागेसाठी पाठपुरावा सुरू झाला. जागा उपलब्ध झाल्यानंतर महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून ती ताब्यात घेण्यात आली. विविध प्रशासकीय प्रक्रिया, आराखडे आणि निधीच्या उपलब्धतेनंतर डिसेंबर 2016 मध्ये हे भव्य संकुल साकार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते संकुलाचे उद्घाटन करण्यात आले.
तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून घडतेय नवी पिढी
संकुलाचे व्यवस्थापन अनिकेत पटणे आणि सुजय पुरी पाहत आहेत. विविध क्रीडा प्रकारांसाठी अनुभवी प्रशिक्षकांची फळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. गणेश पवार जिमसाठी, अनिकेत मोरे आणि सानिका शिरसेकर बॅडमिंटनसाठी, अक्षय भक्ते योगासाठी, तर आदित्य चोरगे आणि तुषार इंगळे जलतरणासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात.
क्रिकेटमध्येही विद्यार्थ्यांना अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांची साथ मिळत आहे. स्पिरिच्युअल स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीचे रणजीपटू जी. आर. देशमुख आणि बी. डी. काकड, महाराष्ट्र अंडर-19 संघाचे अमित कदम, महिला सर्व वयोगटांच्या प्रमुख प्रशिक्षकपदाचा अनुभव असलेले अविनाश धर्मशाळे आणि सहाय्यक प्रशिक्षक रोहन बाटे हे गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत क्रिकेट प्रशिक्षण देत आहेत.
एकाच छताखाली शिक्षण आणि क्रीडा
या संकुलाची सर्वात मोठी ताकद म्हणजे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विल्लू सायरस पूनावाला बॅडमिंटन हॉल, कै. आर. आर. (आबा) पाटील जलतरण तलाव, छत्रपती संभाजी महाराज ऑडिटोरियम हॉल, कै. रामचंद्र (आप्पा) बनकर ई-लर्निंग स्कूल, जिम्नॅशियम आणि क्रिकेट मैदान अशा सुविधा येथे आहेत. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या संकुलात विविध खेळांचे प्रशिक्षण पूर्णतः मोफत दिले जाते.
क्रिकेट, आर्चरी, स्केटिंग, कुस्ती, बास्केटबॉल, जुदो-कराटे, कबड्डी, व्हॉलीबॉल, डॉजबॉल आणि जलतरण अशा विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी मिळते. ही सुविधा केवळ खेळ शिकवण्यापुरती मर्यादित नाही. मैदानावर घाम गाळताना विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वेळेचे नियोजन, संघभावना, आत्मविश्वास आणि पराभवातून पुन्हा उभे राहण्याची जिद्द निर्माण होते. त्यामुळे हे संकुल अनेक विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रशिक्षण केंद्रापेक्षा अधिक मोठे ‘जीवनशाळे’चे काम करत आहे.
अजितदादांचे मोलाचे मार्गदर्शन
संकुलाच्या उभारणीच्या विविध टप्प्यांवर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. जागा ताब्यात घेण्यापासून संकुलाचे आराखडे, विविध विभागांची रचना आणि निधी उपलब्ध करून देण्यापर्यंतच्या महत्त्वाच्या बाबींमध्ये त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. सुनील बनकर आणि वैशाली बनकर यांच्या मते, प्रकल्पाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर अजितदादांचे सहकार्य लाभल्यामुळेच पूर्व भागातील विद्यार्थ्यांसाठी पाहिलेले हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होऊ शकले.
सुविधा नव्हे, तर स्वप्नांना पंख
पूर्व भागातील विद्यार्थ्यांना कोणत्याही मोठ्या संस्थेवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी हे संकुल उभारण्याचा संकल्प केला. आज हजारो विद्यार्थी येथे मोफत शिक्षण आणि क्रीडा प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे सुनील बनकर सांगतात. माजी महापौर वैशाली बनकर यांच्या मते, गोरगरीब विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण आणि मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे. या संकुलातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडत आहेत, हीच आमच्या कामाची खरी पावती आहे.
आज कै. रामचंद्र (आप्पा) बनकर शैक्षणिक व क्रीडा संकुल हे केवळ पुणे महानगरपालिकेची सुविधा राहिलेले नाही; ते पूर्व भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांचे केंद्र बनले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान, तर क्रीडेतून शिस्त, जिद्द आणि नेतृत्वगुण देणारे हे संकुल आर्थिक परिस्थितीपेक्षा प्रतिभेला महत्त्व देण्याचा संदेश देते. मैदानावर घाम गाळणार्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यांत मोठे स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाला बळ देणारे व्यासपीठ म्हणजे बनकर क्रीडा संकुल. पुण्याच्या पूर्व भागातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याच्या दिशेने सुरू असलेला हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे.
राष्ट्रीय पातळीवर चमकणारे खेळाडू
एखाद्या क्रीडा संकुलाचे यश त्याच्या इमारती किंवा सुविधांमध्ये नसते, तर त्या सुविधांमधून घडणार्या खेळाडूंच्या कामगिरीत असते. या निकषावरही बनकर संकुलाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संकुलातील 14 आणि 18 वर्षांखालील अनेक क्रिकेटपटूंची राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. कबड्डी संघाने सलग प्रथम क्रमांक मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. डॉजबॉलमध्ये मागील सात वर्षांपासून अजिंक्यपद कायम राखण्यात विद्यार्थ्यांना यश आले आहे.
लाठी-काठी आणि जुदो-कराटे या क्रीडा प्रकारांमध्येही येथील खेळाडूंनी दिल्ली तसेच नेपाळ येथे उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांच्या मनात ‘आपणही मोठे खेळाडू होऊ शकतो’ हा आत्मविश्वास निर्माण होत आहे. आर्थिक परिस्थिती ही आपल्या स्वप्नांच्या आड येऊ नये, यासाठी मोफत प्रशिक्षणाची व्यवस्था महत्त्वाची ठरत आहे.






