National Sports Day: पीडीएमबीएचे ऐतिहासिक योगदान – खेळाडूंची परंपरा
National Sports Day: दाजीसाहेब नातू आणि ४० वर्षे अध्यक्षपद भूषवलेले अविनाश वार्डेकर यांच्या नेतृत्वाखालील PDMBA चे पुण्यातील बॅडमिंटन चळवळीत मोलाचे योगदान.

National Sports Day: स्वातंत्र्योत्तर काळात पुण्यातील बॅडमिंटन चळवळीला शिस्तबद्ध, व्यावसायिक आणि सर्वसमावेशक रूप देण्यासाठी एका समर्पित स्थानिक संस्थेची आवश्यकता निर्माण झाली. 1934 मध्ये ’बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया’ (इअख) आणि 1946 मध्ये ’महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन’ (चइअ) च्या स्थापनेनंतर, पुण्यातील स्थानिक पातळीवर दाजीसाहेब नातू यांनी ’पूना डिस्ट्रिक्ट अँड मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशन’ (झऊचइअ) ची स्थापना केली.
ते 40 वे सचिव होते. तसेच अविनाश वार्डेकर हे 40 वर्षे अध्यक्ष होते. ज्या शहरात बॅडमिंटनचा जन्म झाला, त्याच शहरात या खेळाची संघटनात्मक धुरा पीडीएमबीएने अत्यंत समर्थपणे सांभाळली. पीडीएमबीएचे सर्वात मोठे ऐतिहासिक योगदान म्हणजे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती. संस्थेने पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज परिसरात आधुनिक लाकडी आणि नंतर सिंथेटिक कोर्ट्स असलेले सुसज्ज बॅडमिंटन संकुल उभारले, जे पश्चिम भारतातील गुणवान खेळाडूंचे मुख्य केंद्र बनले.
या परंपरेचे मुकुटमणी ठरले ते पुण्याचे सुपुत्र नंदू नाटेकर. त्यांनी 1956 मध्ये मलेशियातील प्रतिष्ठित ’सेलँगोर आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप’ जिंकून भारताला बॅडमिंटनमधील पहिले आंतरराष्ट्रीय जेतेपद मिळवून दिले. नाटेकर हे 1961 मध्ये भारत सरकारच्या पहिल्या ’अर्जुन पुरस्कारा’चे मानकरी ठरले. पीडीएमबीएने नाटेकरांच्या या ऐतिहासिक यशाचा वारसा पुढे नेत तळागाळातील गुणवत्ता शोधण्यासाठी आंतरशालेय आणि जिल्हा अजिंक्यपद स्पर्धांचे अखंड जाळे विणले.
पुढील काळात पीडीएमबीएच्या मार्गदर्शनातून आणि कोर्टवरून निखिल कानेटकर (2004 अथेन्स ऑलिम्पिकपटू), तृप्ती मुरगुंडे (2006 राष्ट्रकुल कांस्यपदक व ध्यानचंद पुरस्कार विजेती) तसेच दीप्ती परांजपे, सुशांत चिपलकट्टी यांसारखे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले. खेळाच्या जन्मापासून ते आधुनिक ऑलिम्पियन्स घडवण्यापर्यंत पीडीएमबीएचे योगदान अद्वितीय राहिले आहे.
वर्तमानाशी जोडलेली ऐतिहासिक नाळ आणि वारशाचे जतन
आज जेव्हा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या (इथऋ) स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा डौलाने फडकतो, तेव्हा इतिहासाचे एक संपूर्ण वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटते. ज्या शहराच्या मातीत 1870 मध्ये सैनिकांनी फावल्या वेळेत जाळी बांधून एक खेळ सुरू केला, ज्या शहराने 1873 मध्ये जगाला खेळाचे पहिले नियम दिले आणि ज्या शहराच्या असोसिएशनने (झऊचइअ) खेळाडू घडवण्याची अखंड परंपरा जपली; त्याच देशाचे खेळाडू आज जागतिक पटलावर अग्रस्थानी आहेत.
’द पूना गेम्स’ हा केवळ एका खेळाच्या जन्माचा इतिहास नसून, पुण्याच्या सर्जनशीलतेचा आणि समृद्ध क्रीडा संस्कृतीचा जागतिक पुरावा आहे. आज जग बॅडमिंटन खेळत असले, तरी या खेळाचा आत्मा पुण्याचाच आहे. हा देदप्यमान वारसा जपण्यासाठी पुण्यात एक सुसज्ज ’हेरिटेज बॅडमिंटन म्युझियम’ उभारणे ही काळाची गरज आहे, जेणेकरून कोर्टवर पडणारे प्रत्येक शटलकॉक जगाला या खेळाच्या पुणेरी मुळांची सदैव आठवण करून देत राहील.
ऐतिहासिक घटनाक्रम…
1870 : पुण्याच्या कँटोन्मेंट भागात जाळी लावून ’पूना गेम’ची अधिकृत सुरुवात.
1873 : पुण्यात बॅडमिंटनचे जगातील पहिले लिखित नियम तयार.
1873 : इंग्लंडच्या ’बॅडमिंटन हाऊस’मध्ये खेळाचे प्रात्यक्षिक व नामकरण.
1877 : कर्नल एच. ओ. सेल्बी यांच्याकडून ’रूल्स ऑफ पूना बॅडमिंटन’चे प्रकाशन.
1886 : ’द पूना क्लब’ची अधिकृत स्थापना.
1934 : बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (इख) ची स्थापना.
1946 : पीडीएमबीए व एमबीएची स्थापना आणि स्थानिक क्रीडा चळवळीला गती.
1956 : पुण्याचे नंदू नाटेकर आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय.
1961 : नंदू नाटेकर यांना देशातील पहिला ’अर्जुन पुरस्कार’.
– संकलन: अंजली खमितकर






