National Sports Day : एक मूलमंत्र, अनेक चॅम्पियन्स
खेळाडूंची खाण’ ही ओळख केवळ कागदावर न ठेवता मैदानावर सिद्ध करणारा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर. गेल्या दोन दशकांत जिल्ह्यातील कबड्डीने घेतलेली झेप ही महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.

National Sports Day : खेळाडूंची खाण’ ही ओळख केवळ कागदावर न ठेवता मैदानावर सिद्ध करणारा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर. गेल्या दोन दशकांत जिल्ह्यातील कबड्डीने घेतलेली झेप ही महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील प्रेरणादायी कहाणी ठरली आहे. पंकज शिरसाठचा अर्जुन पुरस्कार, शंकर गदईचे महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद आणि प्रो-कबड्डीच्या मैदानावर चमकणारे अहिल्यानगरचे खेळाडू, ही या प्रवासाची ठळक उदाहरणे आहेत. योग्य निवड, नियोजनबद्ध सराव, अचूक मार्गदर्शन आणि खेळाडूंच्या मेहनतीच्या जोरावर जिल्हा कबड्डीने दबदबा निर्माण केला.
सुमारे 1995 मध्ये महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या परवानगीने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेकडे जिल्ह्याचा कारभार सोपविण्यात आला. 3 ऑक्टोबर 1997 रोजी संस्थेची धर्मदाय नोंदणी झाली. अध्यक्ष दादाभाऊ कळमकर आणि सचिव शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात कबड्डीचा प्रसार करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू झाले. तळागाळातील खेळाडूंना संधी मिळावी यासाठी सर्व गटांच्या जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा सुरू करण्यात आल्या.
काही ठराविक संस्थांची मक्तेदारी मोडून मेहनती आणि गुणवंत खेळाडूंना जिल्हा संघात स्थान मिळू लागले. त्याचा परिणाम लवकरच राज्य पातळीवर दिसून आला. सांगली येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नवोदित खेळाडूंनी कोल्हापूर, पुणे आणि मुंबईसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करत उपविजेतेपद पटकावले. गुलाब बोरुडे, प्रशांत गंधे, शंतनु पांडव, विष्णू उंदरे, सचिन तिवारी, पोपट काळे यांच्यासह अनेक खेळाडूंनी या यशात योगदान दिले.
राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाचा मान
अहिल्यानगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कामगिरीची दखल घेत भारतीय हौशी कबड्डी महासंघाने 2024 मध्ये 70 व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी जिल्ह्याला दिली. स्व. अजितदादा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपुते, शंकरराव गडाख, आ. आशुतोष काळे, आ. मोनिकाताई राजळे, आ. किरण लामटे, आ. रोहीत पवार, आ. प्राजक्त तनपुरे, आ. सत्यजीत तांबे, खा. नीलेश लंके, माजी आ. सुधीर तांबे, मा. आ. लहु कानडे आणि महानगरपलिकेच्या सहकार्याने स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे 33 अर्जुन पुरस्कारप्राप्त आजी-माजी खेळाडूंची उपस्थिती आणि त्यांचा करण्यात आलेला सन्मान हे या आयोजनाचे वैशिष्ट्य ठरले.
मुलींचीही दमदार आगेकूच
पुरुष संघाच्या यशानंतर जिल्ह्यातील मुला-मुलींच्या संघांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. किशोर गटाने दोन वेळा तृतीय क्रमांक, किशोरी गटाने उपविजेतेपद, कुमार गटाने दोन वेळा उपविजेतेपद आणि कुमारी गटाने तृतीय क्रमांक मिळवला. स्नेहा पावरा, सविता शिंदे, संस्कृती शिंदे, वैष्णवी काळे, ज्ञानेश्वरी ढवण आणि फौजिया शेख यांसारख्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. मागील पाच वर्षांत यश साळवे, समर्थ हेलुडे, वेदांत उंदरे, शिवम पटारे, आदित्य शिंदे, राहुल खाटीक आणि शंकर गदई यांच्यासह अनेक पुरुष खेळाडूंनी राष्ट्रीय पातळी गाठली.
पंकज शिरसाठ ते अर्जुन पुरस्कार
याच काळात पंकज शिरसाठ या प्रतिभावान खेळाडूचा उदय झाला. जिल्हा शालेय संघातून कबड्डीची सुरुवात करणार्या शिरसाठ यांनी जिल्हा तसेच महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले. महाराष्ट्राला राष्ट्रीय आणि फेडरेशन चषक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला. त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना शिवछत्रपती पुरस्कार तसेच 2008 मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. शासनाच्या क्रीडा धोरणानुसार त्यांची पोलीस खात्यात उच्च पदावर नियुक्ती झाली. या संपूर्ण प्रवासामागे एक महत्त्वाचा मूलमंत्र होता, तो म्हणजे, संघ निवडताना कोणत्याही प्रामाणिक आणि चांगल्या खेळाडूवर अन्याय होता कामा नये. सचिव शशिकांत गाडे यांनी दिलेला हा संदेश संघटनेच्या कार्यपद्धतीचा आधार बनला.
प्रो-कबड्डीमध्ये अहिल्यानगरचा ठसा
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीनंतर अहिल्यानगरच्या खेळाडूंनी प्रो-कबड्डी लीगमध्येही आपली छाप पाडली. शंकर गदईची गुजरात जायंट्स आणि तेलुगू टायटन्स, आदित्य शिंदेची पुणेरी पलटण, शिवम पटारेची हरियाणा स्टीलर्स, अजित पवार आणि प्रफुल्ल झावरे यांची तेलुगू टायटन्स, सौरभ राऊतची यू मुम्बा, राहुल धनवडेची जयपूर पिंक पँथर्स आणि राहुल खाटीकची बंगळुरू बुल्समध्ये निवड झाली. शंकर गदईला शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले असून, त्याची केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सहाय्यक निरीक्षकपदी नियुक्ती झाली. त्यामुळे कबड्डीच्या माध्यमातून क्रीडा आणि करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात, हा संदेशही नव्या पिढीला मिळाला.
सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून संघटनेचे नाव : शशिकांत गाडे
संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आदी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आज अहिल्यानगर जिल्हा कबड्डी असोसिएशन नावारूपाला आली आहे. भविष्य काळातही हीच कामगिरी कायम रहावी यासाठी जिल्हा कबड्डी असोसिएशन व जिल्ह्यातील कबड्डीसाठी कार्य करणार्या क्रीडा संस्था यांच्याशी संपर्क ठेवून मार्गक्रमण करण्याचा मानस संघटनेचे सचिव शशिकांत गाडे यांनी व्यक्त केला.
पंचसूत्री ठरली यशाची गुरुकिल्ली
अहिल्यानगरच्या कबड्डीच्या यशामागे पाच प्रमुख सूत्रे आहेत. ती म्हणजे, योग्य खेळाडूंची निवड, नियोजनबद्ध सराव शिबिरे, योग्य मार्गदर्शन, खेळाडूंची मेहनत आणि त्यांना मिळणारी प्रेरणा व सन्मान. विनायक भुतकर, राहुल कोकणे, अमोल धानापूर्ण, रितेश घोडके, राहुल आगळे, अशोक पानकडे, संभाजी ढेरे आणि देवा जगताप यांसारख्या मार्गदर्शकांनी या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली. 2025 मध्ये अहमदनगरचे नाव अधिकृतपणे अहिल्यानगर झाल्यानंतर जिल्हा कबड्डी असोसिएशननेही आपले नाव बदलले.
जिल्हा संघटनेचे अध्यक्ष खासदार नीलेश लंके, उपाध्यक्ष मुकेश मुळे, जयंत वाघ, संजय फडके, सुभाष तनपुरे, गोविंद भुजबळ, सचिव शशिकांत गाडे, खजिनदार प्रकाश बोरुडे, सहसचिव विजयसिंह मिस्कीन, भारती पवार, कार्यकारिणी सदस्य कैलास पठारे, बाळकृष्ण कडूस, सुधाकर सुंबे, पोपट कडूस, प्रशांत पवळ, रघुनाथ झिने, शंतनु पांडव, विनायक भुतकर, मधुकर राळेभात, प्रशांत गंधे, दत्ता वाकचौरे, प्रताप बांडे आदींच्या नेतृत्वाखाली संघटनेचा प्रवास सुरू आहे. आज गल्लीतील मातीच्या मैदानापासून प्रो-कबड्डीच्या झगमगत्या प्रकाशझोतात पोहोचलेला अहिल्यानगरचा प्रवास केवळ पदकांचा नाही, तो विश्वास, पारदर्शक निवड, मेहनत आणि योग्य संधीचा विजय आहे.






