National Sports Day : क्रिकेटसारखे व्यवस्थापन हवे…
ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन खेळात जर सातत्याने यश मिळवायचे असेल तर त्यासाठी केवळ विचार करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष नियोजन करावे लागेल.

National Sports Day : ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन खेळात जर सातत्याने यश मिळवायचे असेल तर त्यासाठी केवळ विचार करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष नियोजन करावे लागेल. क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांमध्ये भारत सातत्याने जागतिक दर्जाचे खेळाडू का घडवू शकत नाही, याबाबत कधीही विचार केला पाहिजे. क्रिकेटसारखे व्यवस्थापन सर्व खेळात केले गेले तर चित्र बदलेल.
आज राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्ताने इतकेच सांगावेसे वाटते की, बॅडमिंटनच नव्हे तर सर्वच खेळांमध्ये प्रगती साध्य करायची असेल व जास्तीत जास्त पदके व यश मिळवायचे असेल तर योग्य नियोजन, व्यवस्थापन व सातत्याने विविध स्पर्धांमध्ये खेळण्याची तसेच परदेशातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे गरजेचे आहे.
क्रिकेट आणि इतर खेळांमधील सर्वात मोठा फरक म्हणजे भक्कम व्यवस्था, प्रसिद्धी आणि गुंतवणूक. क्रिकेटकडे उत्कृष्ट व्यवस्था आहे. अधिकाधिक स्पर्धा आयोजित होणे गरजेचे आहे. भारतात क्रिकेट इतके लोकप्रिय आहे, कारण त्यांच्याकडे अत्यंत मजबूत व्यवस्था आहे. त्यांच्या लीग्जचे नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केले जाते. त्याशिवाय त्या सातत्याने टीव्हीवर थेट प्रक्षेपितही केल्या जातात.
इतर खेळांना अशीच प्रसिद्धी मिळत नसल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. इतर अनेक खेळांच्या स्पर्धा सुरू असतात, पण त्या फक्त त्या खेळाचे कट्टर चाहतेच पाहतात. त्यामुळे क्रीडा संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) या खेळांचे अधिक चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करायला हवे. प्रसिद्धी वाढवली तर इतर खेळही क्रिकेटइतके लोकप्रिय होऊ शकतात.
क्रिकेटचे उदाहरणच घ्या, युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला जशी योग्य वयात संधी मिळाली तशी अन्य खेळांतील खेळाडूंना का मिळत नाही, याचाही विचार व्हावा. क्रिकेटमध्ये प्रतिभावान खेळाडूंना सुरुवातीपासूनच जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतात.
वैभवच्या कारकिर्दीसाठी त्याला आजच किती मोठा पाठिंबा आणि किती उत्कृष्ट सुविधा मिळत आहेत. इतर खेळांमध्ये मात्र अशा प्रकारचा आधार आपल्याला कमी प्रमाणात दिसतो. मी जेव्हा माझी कारकीर्द सुरू केली, तेव्हा माझ्याकडे फिजिओ, ट्रेनर किंवा इतर कोणतीही सपोर्ट टीम नव्हती.
मला माझा पहिला फिजिओ 19 वर्षांची झाल्यावर मिळाला. त्यानंतरच मला समजले की, जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी योग्य टीम किती महत्त्वाची असते. एका खेळाडूसाठी फक्त प्रशिक्षक पुरेसा नसतो. आहारतज्ज्ञ, डॉक्टर, मेंटल कोच, फिजिओ आणि इतर तज्ज्ञांची साथ मिळाली तरच खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. भारतातील सर्वात मोठी समस्या म्हणजे खेळाडूंना आवश्यक सुविधा यश मिळाल्यानंतरच दिल्या जातात.
आज आपल्या देशात खेळाडूंना आवश्यक असलेल्या बहुतांश सुविधा ते स्वतःच्या जोरावर यशस्वी झाल्यानंतरच मिळतात. ही परिस्थिती बदलली पाहिजे. खेळाडूंना यश मिळण्यापूर्वीच योग्य सुविधा, प्रशिक्षण आणि पाठिंबा मिळाला तर भारतातून अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होऊ शकतील.
क्रिकेटप्रमाणेच इतर खेळांनाही मजबूत व्यवस्था, सातत्यपूर्ण प्रसिद्धी, आर्थिक गुंतवणूक आणि सुरुवातीपासून मिळणारा दर्जेदार पाठिंबा मिळाला, तर भारत जागतिक क्रीडा महासत्ता बनू शकतो. केवळ राष्ट्रीय क्रीडादिन साजरा केला म्हणजे आपली जबाबदारी संपली असे मानले जाऊ नये, तर देशाच्या क्रीडाविकासासाठी कटिबद्धता हवी तरच हा दिवस सार्थकी लागेल.






