National Sports Day : विजयाची आशा सोडू नका
भारतात आज राष्ट्रीय क्रीडादिन साजरा केला जातोय, याचा आनंद आहेच, परंतु यानिमित्ताने देशातील विविध खेळांतील खेळाडूंना असे सांगावेसे वाटते की, खेळ कोणताही असो त्यात हार-जीत होतच असते...

National Sports Day : भारतात आज राष्ट्रीय क्रीडादिन साजरा केला जातोय, याचा आनंद आहेच, परंतु यानिमित्ताने देशातील विविध खेळांतील खेळाडूंना असे सांगावेसे वाटते की, खेळ कोणताही असो त्यात हार-जीत होतच असते… परंतु विजयाची आशा सोडायची नाही. अखेरपर्यंत लढा द्यायचा व विजय खेचून आणायचा. स्वतःवर विश्वास ठेवत यशासाठी निकराचे प्रयत्न करणे सुरु ठेवायचे. कधीतरी अपयश येणार आहे यासाठी मानसिकता तयार ठेवावी व नकारात्मकता न येऊ देता पुर्णपणे सकारात्मकतेने प्रत्येक पूल उचलायचे. ज्या खेळाडूला हे जमते तोच खरा यशस्वी होतो. अपयशातूनच यशाचा मार्ग सापडतो, यावर माझा खूप विश्वास आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवले तेव्हा खूप आनंद झाला होता; मात्र त्यामागे मी केलेले प्रयत्न कोणालाही दिसले नाहीत याची खंत वाटते. असे वाटणारी मी एकटीच नाही तर कित्येक खेळाडूंच्याबाबतीत हेच घडले आहे. विजयाचा नेहमी मान केला जातो, परंतु अपयशाचे धनी त्या खेळाडूलाच व्हावे लागते. वैयक्तिक मनोरंजन करत राहणे, स्वतःला सतत सकारात्मक ठेवणे व खेळाबाबत अत्यंत गंभीर राहणे ही त्रिसूत्री असते ती पाळली गेलीच पाहिजे.
लहानपणी मला डॉक्टर व्हायचे होते, पण आता वाटते, की बॅडमिंटनपटू बनले जे अधिक चांगले झाले. कारण मला अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रुची होती. ज्यावेळी मी द्विधा मनःस्थितीत होते. तेव्हा माझ्या वडिलांनी मला खेळण्याची प्रेरणा दिली. जेव्हा मी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी माझ्या निवडीवर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत. जेव्हा मी कोर्टवर असते, तेव्हा मी इतरांच्या अपेक्षांचा विचार न करता, स्वतःचा आणि माझ्या अपेक्षांचा विचार करते. कोरोनाकाळ जास्त भयावह होता. सर्व जग थांबले होते व त्यावेळी माझी कारकीर्द कशी टिकून राहील, याचा विचार सतत माझ्या मनात येत होता.
कधीतरी तर खूप नैराश्य यायचे. असे वाटायचे की हा काळ कधी संपणार? मात्र, हा काळ संपला व जेव्हा कोर्टवर परतले तेव्हा पुन्हा एकदा मनाने उभारी घेतली. त्यावेळी मी कुटुंबासोबत अधिक वेळ घालवला आणि असे छंद जोपासले ज्यासाठी तिला पूर्वी कधीच वेळ मिळाला नव्हता. मी वजन उचलण्यासाठी 2 लिटरच्या पाण्याच्या बाटल्या वापरायचे जेणेकरून स्वतःला फिट ठेवू शकेन. याच काळात मी हे शिकले की खेळाडूंना भविष्यात प्रेक्षकांशिवाय होणार्या सामन्यांची सवय करून घ्यावी लागेल.
भारतासारख्या देशात जिथे क्रिकेटकडे वळणारे जास्त आहेत तिथे अन्य खेळांमध्ये कारकीर्द होईल असा विश्वास अनेकांना नसतो. मुख्यत्वे पालकही याबाबत खेळाडूंवर दबाव टाकतात. शिक्षण महत्त्वाचे आहेच, परंतु त्याचबरोबर आता क्रीडाक्षेत्रात नवनव्या संधीही निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे एक खेळाडू म्हणून फारसे यश मिळाले नाही, तरीही प्रशिक्षक, फिजिओ, सपोर्ट स्टाफ अशी अनेक क्षेत्रे आहेत, जिथेे आपण आपली गुणवत्ता व उपयुक्तता सिद्ध करू शकतो, त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. अर्थात, जर देशाला जागतिक क्रीडाक्षेत्रात आपला दबदबा वाढवायचा असेल तर त्यासाठी सर्वच स्तरांवरून प्रयत्न होणे आवश्यक आहे. खेळाला राजाश्रयाबरोबरच लोकाश्रयही मिळाला पाहिजे.
भारतात क्रिकेट, बॅडमिंटन व टेनिसला अच्छे दिन आहेत, परंतु अन्य खेळांबाबत उदासीनता आहे, याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी तब्बल 39 पदके मिळवली. त्यांना रोख पुरस्कारही दिले गेले, तसेच नोकरीच्या संधीही दिल्या गेल्या. असेच सातत्य व पाठिंबा पुढील काळातही राहिला तर आणि तरच भारताची क्रीडाक्षेत्रातील गुणवत्ता जगाला दिसेल.






