National Sports Day : चिंतामणी राऊतचे ‘गोल्ड’ मिशन
लोखंडाचे वजन उचलताना केवळ ताकद पुरेशी नसते, त्यासाठी जिद्द, शिस्त, सातत्य आणि अपयशातून पुन्हा उभे राहण्याची मानसिक ताकदही लागतेच.

National Sports Day : लोखंडाचे वजन उचलताना केवळ ताकद पुरेशी नसते, त्यासाठी जिद्द, शिस्त, सातत्य आणि अपयशातून पुन्हा उभे राहण्याची मानसिक ताकदही लागतेच. हीच ताकद आपल्या कामगिरीतून सिद्ध करणारा ’विशेष’ पॉवरलिफ्टर चिंतामणी बाळासाहेब राऊत आता एका मोठ्या स्वप्नासाठी सज्ज झाला आहे. चिलीतील सँटियागो येथे 16 ते 24 ऑक्टोबर 2027 दरम्यान होणार्या ’स्पेशल ऑलिम्पिक्स वर्ल्ड गेम्स’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून तिरंगा उंचावणे आणि देशासाठी सुवर्णपदक जिंकणे, हे त्याचे पुढचे लक्ष्य आहे.
चिंतामणीच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या कामगिरींची नोंद आहे. कर्नाटकातील दावणगिरी येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकतानाच त्याने ‘स्ट्राँग मॅन’ किताबही मिळवला. दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावले. कोलकाता येथील स्पेशल नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धा तसेच आशियाई स्पर्धांमध्येही त्याने सुवर्णकामगिरी केली आहे. आठ राष्ट्रीय सुवर्णपदके, एक आशियाई सुवर्णपदक आणि एक कॉमनवेल्थ सुवर्णपदक अशी त्याची आजवरची कामगिरी आहे. त्यामुळे चिली वर्ल्ड गेम्ससाठी त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
आपल्या ध्येयासाठी चिंतामणी सध्या पाँडिचेरी येथे कठोर सराव करत आहे. वयाच्या अवघ्या 12-13 व्या वर्षापासून त्याने पॉवरलिफ्टिंगचा सराव सुरू केला. सुरुवातीपासूनच या खेळाबद्दल असलेली आवड आणि त्यासाठी घेतलेली मेहनत यामुळे त्याने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. आतापर्यंत त्याने तब्बल आठ राष्ट्रीय सुवर्णपदके पटकावली आहेत. त्याच्या कामगिरीची ही मालिका आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला अभिमान मिळवून देण्याच्या दिशेने पुढे जात आहे. सन 2022 मध्ये पॅरिस येथे झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक्ससाठी चिंतामणीची निवड थोडक्यात हुकली.
एखाद्या खेळाडूसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेची संधी निसटणे हा मोठा धक्का असतो. मात्र, चिंतामणीने त्या अपयशाला शेवट न मानता नव्या सुरुवातीची संधी मानली. त्याने आपली तयारी आणखी कडक केली. पाँडिचेरी येथील डेब्रेकर जिममध्ये प्रशिक्षक टी. बाकीराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सराव सुरू ठेवला. प्रशिक्षणातील सातत्य, फिटनेस, तंत्र आणि वजन उचलण्याच्या क्षमतेवर विशेष लक्ष देत त्याने स्वतःला अधिक सक्षम बनवले. गेल्या सहा-सात वर्षांतील त्याच्या मेहनतीमुळे आज मिळालेल्या पदकांच्या रूपाने दिसून येते.
‘देशासाठी गोल्ड आणेल’
चिंतामणीच्या या प्रवासाला राजकीय आणि सामाजिक स्तरावरही पाठिंबा मिळत आहे. आमदार योगेश टिळेकर यांनी त्याच्या कामगिरीचे कौतुक करताना त्याच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. विशेष मुलगा असला तरी चिंतामणी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मोठी भरारी घेत आहे. राऊत कुटुंबीयांनी त्याच्या घडणीत मोलाचे योगदान दिले आहे. राष्ट्रीय स्तरावरील त्याची सुवर्णकामगिरी अभिमानास्पद आहे. त्याची जिद्द आणि कुटुंबीयांची मेहनत पाहता 2027 मध्ये चिली येथे तो भारताचे प्रतिनिधित्व निश्चित करेल आणि देशासाठी सुवर्णपदकही जिंकेल, असा मला ठाम विश्वास आहे, असे टिळेकर यांनी सांगितले. चिंतामणी आपल्या मतदारसंघातील असल्याचा विशेष आनंद असल्याचे सांगत, राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला
आवश्यक ती मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आता चिंतामणीसमोर एकच ध्येय आहे, ते म्हणजे निवड चाचणीत सर्वोत्तम कामगिरी करणे, भारताच्या संघात स्थान मिळवणे आणि चिलीच्या भूमीवर आपल्या ताकदीची छाप उमटवणे. आजवरच्या पदकांनी त्याच्या क्षमतेची साक्ष दिली आहे, आता 2027 चे स्वप्न त्याला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे. लोखंड उचलणार्या या हातात तिरंगा घेण्याची वेळ आली, तर त्यामागे असेल वर्षानुवर्षांची मेहनत, कुटुंबाचा त्याग आणि अपयशावर मात करून उभ्या राहिलेल्या एका जिद्दी खेळाडूची कहाणी.
प्रशिक्षकांचा विश्वास, कुटुंबाची साथ
चिंतामणीच्या या प्रवासामागे प्रशिक्षक आणि कुटुंबीयांची मोठी भूमिका आहे. प्रशिक्षक टी. बाकीराज, अशोक नांगरे, जितेंद्र ढोले, डॉ. भगवान तलवारे आणि राजशेखर यांचे त्याला मार्गदर्शन लाभत आहे. स्पेशल ऑलिम्पिक्स भारतच्या अध्यक्षा मल्लिका नड्डा यांचेही त्याला प्रोत्साहन मिळत आहे. वडील बाळासाहेब राऊत, आई रुपाली, बहिणी ऋतुजा आणि कादंबरी तसेच मावसबहीण अस्मिता यांचे भक्कम पाठबळ चिंतामणीला मिळाले आहे.
मुलाच्या क्रीडा कारकिर्दीसाठी कुटुंबाने पाँडिचेरी येथे सहा-सात वर्षे राहून त्याच्या प्रशिक्षणाला प्राधान्य दिले. त्यामुळे चिंतामणीचे यश ही केवळ एका खेळाडूची कामगिरी नसून त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या त्यागाची आणि विश्वासाची फलश्रुती आहे. ‘चिंतामणी गेल्या सहा-सात वर्षांपासून अत्यंत मेहनत घेत आहे. अनेक अडचणींवर मात करत त्याने राष्ट्रीय, आशियाई आणि कॉमनवेल्थ स्तरावर सुवर्णपदके मिळवली आहेत. 2027 मध्ये चिली येथून तो सुवर्णपदक घेऊन येईल, याची मला खात्री आहे, असा विश्वास कॉमनवेल्थ सुवर्णविजेते, चिंतामणीचे प्रशिक्षक टी. बाकीराज यांनी व्यक्त केला आहे.
स्पेशल ऑलिम्पिक प्रबळ दावेदारी
सध्या स्पेशल ऑलिम्पिक भारताच्या निवड चाचण्यांची प्रक्रिया सुरू आहे. सुमारे साडेतीन हजार खेळाडूंमधून अंतिम सात खेळाडूंची निवड होणार आहे. या निवड प्रक्रियेत चिंतामणी अव्वल क्रमांकावर असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याची दावेदारी भक्कम मानली जात आहे. मात्र, निवड निश्चित होईपर्यंत थांबण्याची त्याची मानसिकता नाही. अंतिम क्षणापर्यंत सर्वोत्तम तयारी करण्यावर त्याचा भर आहे. प्रत्येक सराव सत्रातून आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न तो करत आहे. चिलीतील जागतिक व्यासपीठावर भारताचा झेंडा उंचावण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आत्मसात करण्याचे त्याचे प्रयत्न सुरू आहेत.






