National Science Day – आकाशातील गूढ विश्वाचा शोध घेणाऱ्या खोडद (ता. जुन्नर) येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) परिसरात जागतिक विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या दोन दिवसीय विज्ञानाच्या जत्रेत सुमारे २५० विज्ञान प्रकल्प सादर झाले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीने आणि कल्पकतेने उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. विज्ञानाच्या या व्यासपीठामुळे ग्रामीण बुद्धिमत्तेला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी यांच्या हस्ते झाले. यावेळी जीएमआरटीचे केंद्र संचालक डॉ. यशवंत गुप्ता, अधिष्ठाता ईश्वर चंद्रा, डॉ. सदानंद राऊत, सरपंच मनीषा गुळवे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अवकाश संशोधन, पर्यावरण, आरोग्य, शेती तंत्रज्ञान आणि रोबोटिक्स अशा वैविध्यपूर्ण विषयांवर आपल्या प्रतिकृती सादर केल्या होत्या. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला नवे आकाश जगप्रसिद्ध दुर्बिणींच्या साक्षीने भरलेल्या या विज्ञान प्रदर्शनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला नवे आकाश दिले आहे. खोडदच्या जीएमआरटीमध्ये रंगलेली ही ‘विज्ञानाची जत्रा’ केवळ प्रकल्पांचे प्रदर्शन न ठरता, भविष्यातील वैज्ञानिक घडवण्याची नांदी ठरली आहे. शालेय स्तरावरील या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक दृष्टी निर्माण होत असल्याचे दिसून आले. “विज्ञान माणसात प्रश्न निर्माण करते आणि त्या प्रश्नांची चिकित्सा करायला शिकवते. जिज्ञासा हीच प्रगतीची खरी ताकद आहे. ड्रोन व एआय तंत्रज्ञानामुळे शेतीत मोठी क्रांती झाली असून, विज्ञान केवळ प्रयोगशाळेत मर्यादित न राहता ते शेतात आणि दैनंदिन जीवनात उतरले पाहिजे.” – डॉ. कौशिक बॅनर्जी, संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र “हे विज्ञान प्रदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यासपीठ ठरत आहे. दरवर्षी सहभागी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, हे विज्ञानाविषयी वाढत्या आकर्षणाचे लक्षण आहे. विज्ञान माणसाला विवेक, विनम्रता आणि चिकित्सक दृष्टी देते.” – डॉ. यशवंत गुप्ता, केंद्र संचालक, जीएमआरटी