Nitin Gadkari : ‘राष्ट्रीय महामार्गांमुळे आर्थिक विकासाला गती’ – नितीन गडकरी

Nitin Gadkari – दहिवडी मायणी विटा रस्त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची सांगली जिल्ह्यातील लांबी जवळपास 600 कि. मी. पर्यंत पोहोचली आहे. 60 किलोमीटर लांबीच्या रू. 173 कोटीच्या सांगली तासगाव बाह्य वळणासही मंजुरी देण्यात आली आहे. त्याचे भूसंपादन सुरु झाले आहे.
सर्वांनी सहकार्य केल्यास रस्त्याचे कामही लवकरच सुरु होईल. या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे आर्थिक विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
विटा येथे नितीन गडकरी यांच्या हस्ते दहिवडी – मायणी – विटा या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले, नवीन मुंबई – पुणे – बंगळुरू द्रुतगती मार्ग बांधायचे ठरवले आहे. या द्रुतगती मार्गामुळे मुंबई ते बंगळुरू हे जवळपास 800 किलोमीटरचे अंतर आठ तासात पार करता येऊ शकेल.
या मार्गावर 5 ठिकाणी विमान उतरण्याची सोय करण्यात आली आहे. या मार्गाची सांगली जिल्ह्यात 74 किलोमीटर लांबी आहे. या नवीन द्रुतगती मार्गामुळे दुष्काळी भागाच्या आर्थिक विकासासाठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आपण केंद्रीय जलसंधारण मंत्री असताना टेंभू, म्हैसाळ योजनाना मंजुरी देण्याची संधी मिळाल्याचे सांगून या उपसा सिंचन योजनांमुळे दुष्काळी भागाचा कायापालट होऊन हिरवं शिवार फुलल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, दहिवडी मायणी विटा रस्त्यामुळे शिर्डी, शनी शिंगणापूर, शिखर शिंगणापूर यासारख्या धार्मिक स्थळांशी संपर्क सुलभ होईल, ज्यामुळे धार्मिक पर्यटन उपक्रमामध्ये वाढ होईल आणि संबंधित क्षेत्रांचा विकास होईल.
त्याचबरोबर ऊस, हळद आणि द्राक्षे वाहतुकीस लाभदायक ठरणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या सभोवतालच्या परिसराच्या, शहरांच्या सर्वांगीण विकास व रोजगार निर्मितीस सहाय्यक ठरणार आहे.





