पुण्यात नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून राडा: काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले, बालगंधर्व चौकात तणाव!

पुणे –नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या नोटिसीच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. युवक काँग्रेसने खडकी रेल्वे स्टेशनवर लोणावळा-पुणे लोकल ट्रेन अडवून आंदोलन केले, तर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनकडे जात असताना सोनिया आणि राहुल गांधी यांच्या अटकेची मागणी केली. बालगंधर्व चौकात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
खडकीत ट्रेन अडवली, काँग्रेस भवनवर तणाव –
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात प्रवर्तन संचालनालयाने (ED) सोनिया आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल केल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने खडकी रेल्वे स्टेशनवर लोणावळा-पुणे लोकल ट्रेन अडवून आपला रोष व्यक्त केला. दुसरीकडे, भाजप युवा मोर्चाने काँग्रेस भवनवर मोर्चा काढला. “काँग्रेसने २,००० कोटींचा घोटाळा केला आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांना तातडीने अटक करा,” अशी आक्रमक मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. काँग्रेस भवनबाहेर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवल्याने बालगंधर्व चौकात तणाव वाढला.
काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रतिकार-
भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देत काँग्रेस कार्यकर्तेही काँग्रेस भवनबाहेर एकवटले. काही काँग्रेस समर्थकांनी काठ्या हातात घेऊन रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक उफाळली. काँग्रेस भवनात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले असून, “हे राजकीय सूडबुद्धीचे षड्यंत्र आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. या गोंधळात पोलिसांनी काही भाजप समर्थकांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांचा कडक बंदोबस्त –
बालगंधर्व रंगमंदिरापासूनच पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. काँग्रेस भवन परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरण काय आहे?
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेसशी संबंधित असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) आणि यंग इंडियन (YI) यांच्यामार्फत २,००० कोटींच्या मालमत्तेची अनधिकृत हस्तांतरणाची तक्रार आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१४ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीनंतर ED ने २०२१ मध्ये तपास सुरू केला. यंग इंडियनने AJL च्या मालमत्ता केवळ ५० लाखांत घेतल्याचा आणि यात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप आहे. काँग्रेसने हे आरोप फेटाळताना याला “राजकीय सूडबुद्धी” असल्याचे म्हटले आहे.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी लेटेस्ट अपडेट –
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात अलीकडेच प्रवर्तन संचालनालयाने (ED) 15 एप्रिल 2025 रोजी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सॅम पित्रोदा यांच्याविरुद्ध दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले. यात 988 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. विशेष न्यायालयाने याची पुढील सुनावणी 25 एप्रिल 2025 ला निश्चित केली आहे. ED ने 2017 च्या आयकर विभागाच्या मूल्यांकन आदेशावर आधारित हे आरोप ठेवले असून, असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) च्या 2000 कोटींच्या मालमत्तांवर कब्जा करण्याचा कट आखल्याचा दावा केला आहे. यापूर्वी, नोव्हेंबर 2023 मध्ये ED ने 751.9 कोटींच्या मालमत्तांचा ताबा घेतला होता. काँग्रेसने हे आरोप “राजकीय सूडबुद्धी” असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, दिल्ली उच्च न्यायालयात सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी 28 जुलै 2025 पर्यंत पुढे ढकलली गेली आहे, ज्यात ते ट्रायल कोर्टात अतिरिक्त पुरावे सादर करण्याची मागणी करत आहेत.





