बालेवाडीत भरणार ‘राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन’; देशभरातील ४०० विद्यार्थी आणि २०० शिक्षक होणार सहभागी

पुणे – मुलांमध्ये विज्ञान विषयाची गोडी व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे व १४-१८ वयोगटातील विद्यार्थ्यांना आपली सृजनशीलता दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नवी दिल्लीतील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचे मार्फत दरवर्षी कोणत्याही एका राज्याच्या मदतीने चक्राकार पध्दतीने राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते. यंदा महाराष्ट्रात बालेवाडी येथे २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत ही वैज्ञानिक प्रदर्शन भरणार असुन यासाठी ५ कोटी ४१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
४९ व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी-२०२२ चे आयोजन गुवाहाटी, आसाम येथे करण्यात आले होते. यावर्षी ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन २०२३ च्या आयोजनाचे यजमानपद महाराष्ट्र राज्याला मिळाले आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही गौरवशाली बाब आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांच्या हस्ते वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी आयोजन करण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास मान्यताही देण्यात आलेली आहे.
बाल वैज्ञानिक प्रदर्शन आयोजनासाठी ई-निविदा तसेच खरेदीची प्रक्रीया राबवित असताना उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयातील तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेशही राज्य शासनाने जारी केलेले आहेत. वैज्ञानिक प्रदर्शनासाठी राज्य शासनाकडून ४ कोटी ९१ लाख रुपये तर नवी दिल्लीतील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचे नियोजन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेवर सोपविण्यात आलेली आहे. प्रदर्शनी बालेवाडी येथील श्री. शिवछ्त्रपती क्रिडा संकुलात भरणार आहे. विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ४०० विद्यार्थी व २०० शिक्षक यात सहभागी होणार आहेत. २२५ स्टॉल उभारण्यात येणार आहेत. विद्यार्थी विविध सांस्कृतिक कलागुणही सादर करणार आहेत. मार्गदर्शनपर व्याख्याने ही आयोजित करण्यात येणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे यांनी दिली आहे.





