‘Rishab Shetty’ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; घरी येताच पत्नीने केलं स्वागत, Video पाहून नेटकरी म्हणतात….

70th National Film Awards | rishab shetty | Kantara – नुकतंच 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहेत, जे जिंकण्याचे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. हे पुरस्कार दरवर्षी जाहीर केले जातात.
यावर्षीचे पुरस्कार वर्ष 2022 साठी देण्यात आले आहेत. त्याचबरोबर ‘गुलमोहर’ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. तर मल्याळम चित्रपट ‘अट्टमला’ सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा पुरस्कार ‘केजीएफ चॅप्टर 2’ ला जाहीर करण्यात आला आहे.
‘नित्या मेनन’ला तमिळ चित्रपट तिरुचितारामबलमसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर मानसी पारेखला गुजराती चित्रपट ‘कच्छ एक्सप्रेस’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
कन्नड चित्रपट ‘कांतारा’ अभिनेता’ ऋषभ शेट्टी’ याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे अभिनेता तसेच त्याचे संपूर्ण कुटुंब आणि चाहत्यांना देखील खूप आनंद झाला आहे.
View this post on Instagram
‘कांतारा’ हा त्याचा पहिला भारतातील चित्रपट होता आणि त्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ऋषभ शेट्टीचा हा आनंद त्याच्या पत्नी आणि मुलांनी एका खास पद्धतीने साजरा केला आहे. सोशल मीडियावर स्वागत करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ऋषभ शेट्टी घरी पोहोचला. तेव्हा त्याच्या पत्नीने संपूर्ण घर सजवले होते. हातात आरतीचे ताट धरुन ती आपल्या मुलीसह दारात अभिनेत्याची वाट पाहत होती.
ऋषभ शेट्टी घरी येताच त्याने आपल्या मुलीला कुशीत घेतले आणि नंतर पत्नीने औक्षण केले. त्यानंतर ऋषभने पत्नीला मिठी मारली. ऋषभ शेट्टीच्या पत्नीने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, 2022 मध्ये प्रदर्शित झालेला ‘कांतारा’ हा चित्रपट मूळ कन्नड भाषेत बनवला गेला होता. त्यानंतर तो हिंदीसह इतर भाषांमध्येही रिलीज झाला होता. केवळ 16 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने जवळपास 360.33 कोटो रुपयांची कमाई केली होती.





