वाघोली (प्रतिनिधी) : इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शंभर देशांची राष्ट्रगीते त्या त्या देशांच्या भाषेत तोंडपाठ आहेत हे ऐकूण आश्चर्य वाटले ना… ही किमया करून दाखवली आहे. वाघोलीतील ओझोन विला सोसायटीत राहणाऱ्या जयश ठोलीया याने… विविध देशांची राष्ट्रगीते गाऊन जयशने आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आपले नाव कोरले आहे. त्याच्या नावावर चक्क 4 विक्रम कोरले गेले आहेत.
जयश आशिष ठोलीया या द कल्याणी स्कूलमध्ये पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म भारतात झाला आहे तर त्याचे बालपण अमेरिकेत गेले. सध्या ठोलीया कुटुंब वाघोलीत वास्तव्यास आहे. अभ्यासात हुशार असणारा जयश वयाच्या पाचव्या वर्षापासून विविध देशांची राष्ट्रगीते शिकत आहे, त्याच्या या आवडीला त्याच्या पालकांनी पाठिंबा दिला आणि त्याच्या आवडीला मूर्त रूप मिळाले.
जयशने आधी तीनदा 75 देशांची राष्ट्रगीते गाऊन रेकॉर्ड केले तर आता त्याने शंभर देशांची राष्ट्रगीते गाऊन आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद केली आहे. तो भारतासह पाकिस्तान, सौदी अरेबिया, रशिया, अमेरिका, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ग्रीस आदी देशांची राष्ट्रगीते त्या-त्या देशांच्या भाषांमध्ये गातो. त्याचे VOICE OF JYASH हे युट्युब चॅनेल व फेसबुक पेज सुद्धा आहे.
जयश एकदा भारत-पाकिस्तान सामना पाहत असताना त्यात दोन्ही देशांचे राष्ट्रगीत ऐकल्यानंतर त्याला उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर तो सोशल मीडियाद्वारे विविध देशांची राष्ट्रगीते सर्च करू लागला आणि शिकू लागला, त्याच्या नोट्स काढून संगीत समजून घेत आणि त्यातील भाषिक बारकावे शिकून घेतले.
काही दिवसानंतर ही गोष्ट त्याच्या आई-वडिलांना कळाली. आपला मुलगा विविध देशांची राष्ट्रगीते शिकत असल्याचे एकूण पालकांना आश्चर्य वाटले पण आपल्या मुलाच्या आवडीला पाठिंबा दिला. बघता बघता तो शंभर देशांची राष्ट्रगीते शिकला. त्यानी गायलेली हीच राष्ट्रगीते व्हिडीओ स्वरुपात आई-वडिलांनी रेकॉर्ड केले आणि सोशल मीडियावर अपलोड केले, त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. कालांतराने त्याच्या पालकांनी त्याचे व्हिडिओ वेगवेगळ्या रेकॉर्डसाठी पाठवले. अगदी हुबेहूब इतर देशांचे राष्ट्रगीत गाणाऱ्या जयशने विक्रमावर नाव कोरले आहे.
“जयश ने आपल्या आई वडिलांच्या साथीने अनेक देशाचा सार्थ अभिमान विषद करणारे राष्ट्रगीत तोंडपाठ करून नवा विक्रम उभा केला आहे. अभ्यासाव्यतिरिक्त कल्पकता आणि अभिनव उपक्रमाचे जयश हे आदर्श उदाहरण म्हणावे लागेल.
– राजेंद्र सातव पाटील(राष्ट्रवादी नेते, हवेली तालुका)
आपल्या यशाबद्दल जयश म्हणाला, राष्ट्र गीतांमधील भाषिक ज्ञान, त्यातले संगीत, शब्दरचना आणि त्यातील वेगळेपण हे शिकून घेतले तसेच त्याचा वारंवार सराव करीत गेलो. सुरुवातीला वेगवेगळ्या भाषा बोलताना अडचणी येत होत्या पण हळूहळू राष्ट्रगीत शिकणे सोपे झाले. राष्ट्रगीते शिकणे सोपे काम नव्हते परंतु ते मी योग्यरित्या अवगत करू लागलो. मी हे दोन्ही विक्रम केले याचा आनंद आहे. आपआपल्या देशाच्या राष्ट्रगीताबद्दल प्रत्येकालाच अभिमान आहे. आपण इतर देशांतील राष्ट्रगीते ऐकली पाहिजे त्यातून प्रेरित होऊनच ही आवड जपली आहे.
आयटी व्यावसायिक असणारे त्याचे वडील आशिष ठोलीया सांगतात, माझा मुलगा विविध देशाची राष्ट्रगीते गातो हे ऐकून आश्चर्य वाटले. हे काहीतरी वेगळे असल्याने मला जाणवले. त्याच्या कल्पकतेला वाव देण्याचे आम्ही ठरवले. तो राष्ट्रगीते शकत गेला आणि त्याची हे वेगळेपण आम्ही व्हिडिओतून रेकॉर्ड करीत गेलो. त्याने जे यश मिळविले आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे.जयश या नेत्रदीपक यशाबद्दल राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील, वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री सातव पाटील यांनी त्याचा सत्कार केला आहे.