RSS | Narendra Modi – राष्ट्र प्रथम ही संघाची पहिल्यापासून विचारसरणी होती. परिणामी ब्रिटिश आणि निजामाच्या राजवटीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मोठा त्रास सहन करावा लागला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. तसेच भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच नाण्यावर भारतमातेला स्थान मिळाले असल्याचे त्यांनी नमूद मेले. नवी दिल्ली येथे आयोजीत एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी संघाला वाहिलेले 100 रुपयांचे विशेष नाणे आणि पोस्टाच्या तिकीटाचे अनावरण केले. नरेंद्र मोदी म्हााले, उद्या (2 ऑक्टोबर) विजयादशमी आहे. या सणाचे हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. सत्याचा असत्यावर विजय, चांगल्याचा वाईटावर विजय, अन्यायावर न्यायाचा विजय आणि प्रकाशाचा अंधकारावर विजय हे विजयादशमी सणाचे प्रतीक आहे. विजयादशमीनिमित्त संघाची 100 वर्षांपूर्वी स्थापना करणे हा निव्वळ योगायोग नव्हता. तर ते हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरा, संस्कृतीचे पुनरुत्थान होते. आजची पिढी नशीबवान आणि भाग्यवान आहे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा पाहायला मिळत आहे. स्थापनेपासूनच संघाने राष्ट्र कार्यात स्वतःला वाहून घेतले. स्वातंत्र्य लढ्यात संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांना तुरूंगवास भोगावा लागला. त्यांच्याबरोबर संघाचे अनेक सदस्यही तुरुंगात गेले होते. संघाने स्वातंत्र्य चळवळीत अनेकदा भाग घेतला होता आणि कित्येक स्वातंत्र्यवीरांना निवारा आणि मदत देण्याचे काम केले. १९४२ साली महाराष्ट्रातील चिमूर येथील आंदोलनात अनेक संघाच्या स्वयंसेवकांना ब्रिटिशांकडून त्रास सहन करावा लागला होता. एवढेच नाही तर स्वातंत्र्यानंतरही हैदराबादचे निजामांकडूनही संघाच्या स्वयंसेवकांना त्रास भोगावा लागला. गोवा आणि दादरा व नगर हवेलीच्या स्वातंत्र्यासाठीही संघाने आंदोलन केले होते, असे त्यांनी म्हटले.