नातीगोती उतरली मैदानात…; उमेदवारांची कुटूंब उतरली प्रचारात

पुणे – विधानसभा निवडणुकीत सर्वच मतदारसंघात इच्छूकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी न मिळाल्याने इतर इच्छूक नाराज झाले आहेत. त्यामुळे, त्यांच्याकडून आपला प्रचार कितपत केला जाईल याबाबत शंका असल्याने अनेक उमेदवारांंकडून प्रचारासाठी आपल्या नातेवाईकांना साद घालण्यात आली आहे.
घरोघरी जाऊन पत्रके वाटण्यापासून ते प्रचाराचा थेट प्रचाराचे नियोजन आणि खर्चाची जबाबदारीही नातेवाईकांकडे देण्यात आली आहे तर काही उमेदवारांची मुलेच थेट मैदानात असून त्यांच्यासाठी ही भावी पिढीच्या निवडणुकांची तयारी ठरत आहेत. त्या सोबतच कार्यकर्त्यांशी संपर्काची जबाबदारीही नातेवाईकांकडे देण्यात आल्याने अनेक उमेदवारांचे कार्यकर्ते नाराज असल्याचेही चित्र आहे.
कुटूंब पुन्हा एकत्र…
शहरातील अनेक उमेदवारांच्या अनेक पिढ्या पुण्यात स्थायिक असल्याने त्यांच्या नातेवाईकांची कुटूंबे शहराच्या वेगवेगळ्या भागात विस्तारलेली आहेत. मात्र, संपत्तीचे विभाजन, कुटूंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने एकत्र कुटूंबाचे विभाजन झाल्याने अनेकांची क़ुटूंबे केवळ सण अथवा एखाद्या कार्यक्रमालाच एकत्र येत असत. मात्र, आता निवडणुकांच्या निमित्ताने उमेदवारांनी सर्व नातेवाईकांना साद घालत सर्व कुटूंब एकत्र करण्यात यश मिळविले आहे.
त्याचे सोशल मीडियाचे गट करून कुटूंबाचे मेळावे घेऊन त्यांना प्रचारासाठी मदत करण्याची साद घालण्यात आली आहे. त्यामुळे, निवडणुकीतील प्रचार फेऱ्या आणि पदयात्रा वगळता आपली जुनी घरे असलेल्या परिसरात भेटीगाठी तसेच प्रत्यक्ष नागरिकांच्या घरी जाऊन पत्रके वाटण्याची तसेच आपण स्वत: उमेदवाराचे नातेवाईक असल्याचे सांगत मतदारांना भावनिक साद घातली जात असल्याचे चित्र आहे.
पुढच्या पिढीला निवडणूकीचे धडे…
या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक उमेदवारांकडून आपल्या पत्नीसह, मुलगा आणि मुलीकडे प्रचार तसेच नियोजनाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे एरवी उमेदवारांच्या जाहीर कार्यक्रमातही न दिसणारे उमेदवारांची पुढची पिढी आता थेट प्रचारात सक्रीय झाल्याने पुढच्या पिढीला घरातूनच राजकरणाचे धडे मिळत असल्याचे चित्र आहे. तसेच कार्यकर्त्यांसमवेत हे नातेवाईकही जुळवून घेत असल्याने एका बाजूला नाराज गायब असले तरी कुटूंबियांची मदत उमेदवारांसाठी मोलाची ठरत आहे.





