Nasrapur case: अवघ्या पावणेदोन महिन्यांत कामकाज पूर्ण; नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल
Nasrapur case: गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत पोलिसांनी दाखल केले होते ११०० पानांचे आरोपपत्र; ५५ हून अधिक साक्षीदारांच्या जबाबांनंतर आज फैसला.

Nasrapur case – महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यात या खटल्याचा निकाल उद्या (गुरुवारी दि. २५) लागणार आहे. राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेला हा पहिलाच खटला ठरणार आहे.
महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर पुणे शहर, जिल्ह्यासह राज्यात संतप्त पडसाद उमटले. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक नेमण्यात आले. या पथकात सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला. या प्रकरणात भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला अटक करण्यात आली. या खटल्यात सीसीटीव्ही चित्रीकरण, वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक अहवाल,
प्रत्यक्षदर्शींची साक्ष अशा विविध बाजूने तपास करून पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर १५ दिवसांत ११०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोपपत्रासोबत ५५ पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे, तसेच तांत्रिक पुरावे जोडले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात २१ मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरू झाली.




