Nasrapur Case : भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
Nasrapur Case : मूक आक्रोश मोर्चानंतर आता भोर-राजगडमध्ये स्वयंस्फूर्तीने बंद, आरोपीला कठोर शिक्षेसाठी जनता एकवटली.

Nasrapur Case – नसरापूर येथील तीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराचे संतप्त पडसाद भोर, राजगड तालुक्यात उमटले. रविवार (दि.३) रोजी भोर, राजगड तालुक्यात नागरिक, सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कडकडीत बंद पाळला. नसरापूर येथे दिवसभर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. गावात अजूनही संतापाची धग कायम असून तणावपूर्ण वातावरण आहे.
खेड- शिवापूर टोलनाक्यावर आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. नसरापूर येथे समाजसेविका तृप्ती देसाई यांनी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अत्याचाराचा निषेध करीत आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली. शनिवार (दि.२) तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराची घटनेनंतर संतापाचा उद्रेक झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी गावातून मूक आक्रोश मोर्चा काढला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नसरापूर येथील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जाईल आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार संग्राम थोपटे यांनी गावास भेट दिली होती. खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी गावास भेट दिली होती. नसरापूर येथील अत्याचारप्रकरणी संतापाचे सूर तालुक्यात उमटले. भोर, राजगड तालुक्यात बंदची हाक दिली होती.
या आवाहनाला प्रतिसाद देत भोर शहर, तालुका, राजगड तालुक्यात कडकडीत बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद केले होते. भोर व राजगड तालुक्यातील नागरिकांमधून तीव्र संतापाच्या भावना उमटत आहे. दरम्यान, खेड शिवापूर टोलनाक्यावर आंबेडकर चळवळीतील संघटनांनी आंदोलन केले. सातारा महामार्गावर नसरापूरपासून काही किलोमीटरपर्यंत नागरिकांनी दुकाने बंद ठेवली होती. महामार्गावर रविवारी फक्त वाहने दिसत होती. महामार्गालगतच्या गजबजलेल्या गावात सर्वत्र सन्नाटा दिसून येत होता.





