Nashik News : मतदानाच्या आदल्या दिवशी नाशिकच्या हॉटेलमध्ये सापडलं तब्बल 2 कोटींचं घबाड

Maharashtra Assembly Election 2024 | Nashik : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. हॉटेल विवांता येथे तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बविआचे नेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी केला आहे.
यावेळी भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, ही घटना ताजी असतानाच आता नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये तब्बल 2 कोटींचं घबाड सापडलंय. पैशांचं हे घबाड कुणाचं आहे आणि ते कशासाठी आणण्यात आलं होतं? असे अनेक प्रश्न सध्या समोर आहेत.
तब्बल 1 कोटीं 98 लाख रुपये नाशिकमधील एका हॉटेलमध्ये सापडलेत. पाचशे रुपयांच्या नोटींची ही बंडल कुणाची आहे याचा तपास सुरू आहे.
मात्र निवडणुकीसाठीच ही रक्कम आणल्याची माहिती आहे. नाशिकमधील या हॉटलेमध्ये कोट्यवधी रुपये येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाला मिळाली होती. त्यानुसार आयोगाच्या अधिकाऱ्यांचे भरारी पथक हॉटेलमध्ये शिरले.
टीप मिळाल्यानुसार हॉटेलमधील या खोलीत अधिकारी दाखल झालेत. त्यांनी तपास केल्यानंतर त्यांना ह्या बॅग मिळाल्यात. या बॅगमधील नोटांची बंडल पाहून अधिकारीही चक्रावलेत.
निवडणूक आयोगाचे अधिकारी हे पैसे कुणाचे आहे आणि कशासाठी आणले होते याचा तपास आता करताहेत. राजकीय धागेदोऱ्यांचा आयोग आणि पोलिस शोध घेताहेत.





