कुंभमेळ्यापूर्वी नाशिक महापालिकेची मोठी भरती! ‘या’ पदांसाठी अर्ज सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती

नाशिक: वाढत्या शहर विस्तारासोबतच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक मनुष्यबळाची निकड भरून काढण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने (NMC) महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महापालिकेने स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत अभियंत्यांसह अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन संवर्गातील एकूण ३०० रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी १० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.
कमी मनुष्यबळामुळे कुंभमेळ्याच्या कामांवर परिणाम होऊ नये म्हणून शासनाने फेब्रुवारीमध्ये १४० अभियंत्यांची पदे भरण्यास मान्यता दिली होती. आता या प्रक्रियेअंतर्गत, गट ‘क’मधील ११४ सहायक आणि कनिष्ठ अभियंत्यांची पदे भरली जातील. यामध्ये सहायक अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत) आणि कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत, वाहतूक) तसेच सहायक कनिष्ठ अभियंत्यांच्या विविध जागांचा समावेश आहे.
यासह, गट ‘क’ आणि ‘ड’ मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील १८६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात १५० फायरमन (अग्निशामक) आणि ३६ चालक-यंत्रचालक/वाहनचालक (अग्निशमन) पदांचा समावेश आहे.
एकूण ७०८२ मंजूर पदांपैकी तीन हजारांहून अधिक पदे रिक्त असताना, ही भरती महापालिकेसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेतील तपशील जसे की शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, अभ्यासक्रम आणि अर्ज शुल्क यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.





