Uddhav Thackeray : नाशकात उद्धवसेनेला धक्क्यावर धक्का! ‘हा’ बडा नेता शिंदेसेनेत जाण्याच्या तयारीत

नाशिक : उद्धवसेनेला निवडणुकीच्या तोंडावर नाशकात पुन्हा नवा हादरा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धवसेनेतील धडाडीचे नेते सुधाकर बडगुजर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर आता नाशिकचे महानगरप्रमुख विलास शिंदेही जय महाराष्ट्र करण्याची तयारी करत असल्याचे चित्र आहे. ते येत्या रविवारी ८ माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत् आहे.
काही दिवसांपुर्वी विलास शिंदेंनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मला पक्षातून सातत्याने डावलण्यात येत आहे. आता ज्यांच्याकडे जिल्हाप्रमुखपद दिले आहे, त्यांच्यासोबत कुणीही नाही, तरी देखील त्यांना जिल्हाप्रमुख केले आहे. मला विधानसभेची उमेदवारी देखील नाकारण्यात आली.
माझी नाराजी मी संजय राऊत साहेबांकडे सांगितली होती, मात्र २५ दिवस उलटून देखील कोणतीच हालचाल झाल्याचे दिसून येत नाही, असे विलास शिंदेंनी बोलताना सांगितले आहे. दरम्यान, अलीकडेच विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती.
त्याच वेळी विलास शिंदे याच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. सुधाकर बडगुजरांनी देखील मागील काळात उद्धवसेनेला जय महाराष्ट्र केला होता, त्यामुळे आता महानगरप्रमुख असणार्या विलास शिंदेंनी देखील उद्धवसेनेला रामराम केल्यास, उद्धवसेनेची नाशकातील डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
नाशकात शिंदेसेनेचे ताकद वाढणार
महानगरप्रमुख विलास शिंदेंच्या बरोबरीने माजी आमदार अपूर्व हिरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यामुळे ते देखील शिंदेसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांना उधान आले आहे. सध्या ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आसले तरी राजकियदृष्ट्या सक्रिय नाहीत.
मात्र, काही दिवसांपासून ते पक्षात अस्वस्थ असल्याचे बोलले जात होते. अपुर्व हिरे यांचे बंधू अद्वय हिरे हे सध्या उद्धवसेनेत उपनेते पदावर आहेत. त्यामुळे अपुर्व यांनी आगामी काळात शिंदेसेनेत गेल्यास एक भाऊ शिंदेसेनेत तर दुसरा भाऊ उद्धवसेनेत अशी राजकिय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.





