मार्केटिंग नेता बनून फिरणे सोपे पण…; मालेगावातून अमित शाहांचा शरद पवारांना टोला, ‘हा’ प्रश्नही विचारला

Amit Shah Malegaon Speech : सहकार क्षेत्रासाठी शरद पवार यांनी काय केले? साखर कारखान्यासाठी काय केले? असे प्रश्न भाजपचे नेते तथा केंद्रीय गृह आणि सहकारीता मंत्री अमित शाह यांनी उपस्थित केला. केवळ मार्केटिंग करून नेता होणे पुरेसे नाही तर त्यासाठी जमिनीवर काम करावे लागते, असा टोला देखील अमित शाह यांनी लगावला आहे. नरेंद्र मोदी यांनी यांनी सहकारिता मंत्रालयाची निर्मिती केली, इथेनॉल योजना आणली, अशा अनेक योजना नरेंद्र मोदी यांनी आणल्या असल्याचा दावा अमित शाह यांनी केला आहे. शहा यांनी नाशिकच्या मालेगाव येथे आयोजित “सहकार संमेलनात” सहकाराशी संबंधित विविध योजनांचा शुभारंभ केला आणि उपस्थितांना संबोधित केले.
नासिक (महाराष्ट्र) में आयोजित ‘सहकारिता सम्मेलन’ में सहकारिता से जुड़े विभिन्न कार्यों का शुभारंभ कर रहा हूँ।
नाशिक (महाराष्ट्र) येथे आयोजित “सहकार संमेलनात” सहकाराशी संबंधित विविध योजनांचा शुभारंभ करीत आहे. https://t.co/SRtCGhOG6p
— Amit Shah (@AmitShah) January 24, 2025
नेमकं काय म्हणाले अमित शाह?
महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचा 46 हजार कोटी रुपये टॅक्स कमी करण्याचे काम आमच्या सरकारने केले. पवार साहेब आपण 10 वर्ष कृषी मंत्री राहिलात, त्यावेळी सहकार क्षेत्र आपल्याकडे होते, आपण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी, सहकरासाठी काय केले? मार्केटिंग नेता बनून फिरणे सोपे आहे, जमिनीवर राहून काम करणे गरजेचे असते, असा हल्लाबोल यावेळी अमित शाह यांनी शरद पवारांवर केला आहे.
लाल बहादुर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला, नरेंद्र मोदी यांनी जय विज्ञानचा नारा दिला. सहकाराच्या माध्यमातून चालवले गेले तर शेतीमध्ये निश्चित फायदा होतो. शेतकरी परंपरागत शेती करतो, अत्याधुनिक भूमी परीक्षण प्रयोगशाळा इथे तयार करण्यात आली आहे. पाण्याची पीए मात्रा किती आहे याचा अभ्यास देखील याठिकाणी केला जातो आहे. 1500 गिर गाई आहेत, त्यातून सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तयार होतील. यामुळे ऑरगॅनिक शेतीची सुरुवात देखील होईल. ऑरगॅनिक लॅबोरेटरी सुरू करा, भारत सरकार तुम्हाला मदत करेल असे मी शिवाजीराव यांना सांगितले आहे.
हर हर महादेव!
आज नाशिक (महाराष्ट्र) येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्री त्र्यंबकेश्वर महादेवाचे दर्शन-पूजन करुन देशवासियांचे सुख, शांती आणि समृद्धीची कामना केली. pic.twitter.com/GWWsn9hc1C
— Amit Shah (@AmitShah) January 24, 2025
सहकार मंत्रालयाने ऑरगॅनिक को ऑपरेटिव्ह लिमिटेड तयार केले आहे. या माध्यमातून येणारा फायदा थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर जाणार आहे. त्यासाठी लागणारे प्रमाणपत्र ही संस्था देणार आहे. आत्म निर्भरतेची सर्वात सुंदर व्याख्या सहकार आहे. त्यामुळे मोदींनी सहकार ते समृद्धी असा नारा दिला आहे. या संस्थेत 1 लाखांहून अधिक सदस्य आहेत इथे अत्यंत सुंदर ड्रिप व्यवस्था आहे. 80 टक्के शेती इथे ड्रीपद्वारे होते, असं अमित शाह यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे, छगन भुजबळांची उपस्थिती
अमित शहा यांच्या या कार्यक्रमाला उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ देखील उपस्थित होते. अमित शहा यांच्या बाजूच्याच खुर्चीवर छगन भुजबळ बसलेले होते. यावेळी दोन्ही नेत्यांत काहीवेळ संवादही झाला. छगन भुजबळ यांची गेल्या काही दिवसांपासून भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यातच भुजबळ हे अजित पवार यांच्यावर देखील नाराज आहेत. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ हे भाजपमध्ये जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.





