Nashik Earthquake : नाशिकमध्ये आज पुन्हा भूकंपाचे धक्के; महिनाभरात 25 हून अधिक हादरे, प्रशासन सतर्क
Nashik Earthquake : नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यात सोमवारी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. महिनाभरात राज्यात २५ हून अधिक धक्के बसले असून तज्ज्ञांनी याला 'अर्थक्वेक स्वार्म' म्हटले आहे.

Nashik Earthquake : नाशिक जिल्ह्याला सोमवारी पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, सकाळी ५:०६ वाजता २.५ आणि दुपारी १२:४० वाजता ३.० रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ५ किलोमीटर खोलीवर होता. या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
या भागांना बसले हादरे –
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यातील काही गावांमध्ये जमीन हादरली. यापूर्वी ८ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये ४.३ तीव्रतेचा सर्वात मोठा धक्का जाणवला होता. तसेच २५ ते २८ जुलै आणि ६, ८, १० व १४ ऑगस्ट रोजीही धक्के नोंदवले गेले होते. सुरगाणा तालुक्यातील भादर आणि दिंडोरीतील नानाशी येथे काही घरांच्या भिंतींना तडे गेले होते.
महिनाभरात २५ हून अधिक धक्के; ‘अर्थक्वेक स्वार्म’ची स्थिती –
गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात २ ते ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे २५ हून अधिक लहान-मोठे धक्के जाणवले आहेत. हे सर्व धक्के ५ ते ८ किमी खोलीवर झाले असून नाशिक व पालघरमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा वारंवार येणाऱ्या लहान भूकंपांच्या मालिकेमुळे ही ‘अर्थक्वेक स्वार्म’ची स्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासनाला जनजागृतीचे निर्देश –
वाढत्या भूगर्भीय हालचालींची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात प्रशासनाला या परिस्थितीचे मूल्यांकन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन जनजागृती मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.





