Nashik Accident : नाशिक जिल्ह्यात एका उघड्या विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये सहा मुलांचा समावेश होता. मृत सर्व दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील दरगुडे कुटुंबाचे सदस्य होते. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दिंडोरी शहरातील शिवाजी नगर भागात हा अपघात घडला. मृत व्यक्तींची ओळख सुनील दरगुडे (३२), रेश्मा दरगुडे, आशा अनिल दरगुडे (३२) आणि कुटुंबातील सहा मुले ज्यामध्ये ७ ते १४ वयोगटातील पाच मुली आणि ११ वर्षांच्या एका मुलाचा समावेश होता. या दुर्दैवी घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आणि सार्वजनिक क्षेत्रांमधील उघड्या विहिरींचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. नेमकं काय घडलं? पोलिसांच्या माहितीनुसार, परिसरातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहून हे सर्वजण घरी परतत असताना कार्यक्रमस्थळा जवळच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीत त्यांची कार कोसळली. स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन सेवांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि मध्यरात्री दोन क्रेन मदतीने त्यांनी कार आणि त्यातील प्रवाशांना विहिरीतून बाहेर काढले. मृतदेह दिंडोरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अपघातस्थळाला भेट दिली. सदर विहीर बुजवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना सरकारतर्फे ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल. या घटनेचा सखोल तपास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा अपघात अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले. सदर विहिरीची संरक्षक भिंत (कठडा) खूपच कमी उंचीची होती आणि ती लोकांची सतत वर्दळ असलेल्या भागात मध्यभागी स्थित होती, असे त्यांनी नमूद केले. राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर बाधित कुटुंबाला राज्य सरकारतर्फे आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रस्ते किंवा लोकांची वर्दळ असलेल्या क्षेत्रांमध्ये स्थित असलेल्या सर्व विहिरींचा आढावा घेण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा ठिकाणांचे ऑडिट (तपासणी) होणे आवश्यक आहे, जेणेकरून या विहिरी खरोखरच गरजेच्या आहेत का? आणि तिथे सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना राबवता येतील, याचे मूल्यांकन करता येईल, असे ते म्हणाले.